वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. केंद्र सरकार बंगालला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी बीएसएफलाही लक्ष्य केले. बीएसएफ बांगलादेशातून दहशतवाद्यांना बंगालमध्ये घुसू देत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला. ममता यांनी केंद्रावर बंगालमध्ये दहशतवादी घटकांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. बंगालमधील दहशतवाद्यांच्या कारवायांसाठी थेट स्वरुपात केंद्र सरकार व बीएसएफ जबाबदार असल्याचा आरोप ममता यांनी प्रशासकीय बैठकीदरम्यान केला. बीएसएफ विविध भागांमधून बंगालमध्ये घुसखोरी घडवून आणत आहे. बीएसएफच्या महासंचालकांना याप्रकरणी चौकशी करण्यास सांगणार आहे,
तृणमूल काँग्रेस घुसखोरी घडवून आणत असल्याचे कुणी म्हणत असेल तर सीमा बीएसएफच्या अधीन असून बीएसएफच हे सर्व घडवत असल्याचे मी म्हणेन. याचमुळे घुसखोरीसाठी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला जाऊ नये असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले. पोलिसांकडे सर्व माहिती आहे. केंद्राकडे देखील सर्व माहिती आहे. राजीव कुमार यांनी मला काहीप्रमाणात माहिती दिली असून स्थानिक स्रोतांकडूनही माहिती प्राप्त झाली आहे. मी यासंबंधी पत्र लिहिणार आहे. बंगाल आणि बांगलादेशमध्ये शांतता इच्छिते, आमच्यात कुठल्याही प्रकारचे शत्रुत्व नाही. तसेच माझ्या राज्यात कुणी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे नजरेत आल्यास मी विरोध करणार, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.









