वृत्तसंस्था / कोलकाता
बंगाली भाषिक लोकांना भारतीय जनता पक्ष शासित राज्यांमध्ये त्रास दिला जात आहे. त्यांची नावे मतदारसूचींमधून वगळली जात आहेत, असा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोर्चा काढला आहे. आसाम आणि इतर राज्यांमध्ये अवैधरित्या भारतात घुसलेल्या लोकांना पकडले जात असून त्यांची पाठवणी स्थलांतरितांच्या शिबीरांमध्ये करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्येही केंद्र सरकार असेच अभियान बेकायदा स्थलांतरितांच्या विरोधात चालविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अभियानाला विरोध करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
बिहारमध्ये सध्या निवडणूक आयोगाने अवैध मतदारांना शोधण्यासाठी अभियान चालविले असून आतापर्यंत 35 लाखांहून अधिक अवैध नावे मतदारसूचींमधून काढली गेली आहेत. आणखी 10 दिवस हे अभियान चालणार आहे. पश्चिम बंगालमध्येही बांगलादेशमधून घुसलेल्या अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी निवडणूक आयोग अभियान चालविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये तर पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी मतदारसूची ‘स्वच्छ’ करण्याचे काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. याला विरोधी पक्षांचा विरोध आहे.
अवैध मतदारांची नावे मतदारसूचींमध्ये
भारतात बांगलादेशमधून घुसखोरी केलेल्या अनेक अवैध लोकांनी आपली नावे मतदारसूचींमध्ये घुसविली आहेत. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. जे लोक भारताचे वैध नागरिक नाहीत, त्यांना शोधून त्यांची नावे मतदारसूचींमधून काढण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.








