सौरव गांगुली यांचाही शिष्टमंडळात समावेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 12 दिवसांच्या स्पेन आणि दुबई दौऱ्यासाठी मंगळवारी कोलकाता विमानतळावरून रवाना झाल्या आहेत. दुबईत रात्री वास्तव्य केल्यावर बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी या स्पेनची राजधानी माद्रिदसाठी रवाना होणार आहेत.
माद्रिदमधील तीन दिवसीय उद्योग परिषदेत ममता बॅनर्जी सामील होणार आहेत. माद्रिद येथील परिषदेत सामील होणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या शिष्टमंडळात सौरव गांगुली यांचा समावेश असणार आहे. स्पेनमधील बंगाली भाषिकांशी ममता बॅनर्जी संवाद साधणार आहेत. कोलकात्यात 21-22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 7 व्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटवरून ममतांचा विदेश दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विदेश दौऱ्याद्वारे ममता बॅनर्जी या राज्यात अधिकाधिक विदेशी गुंतवणुकदारांना आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
माद्रिदमध्ये तीन दिवस वास्तव्य केल्यावर ममता बॅनर्जी बार्सिलोना येथील दोन दिवसीय बिझनेस समिटमध्ये सहभागी होतील. यानंतर बार्सिलोनामधून त्या दुबईत परतणार असून तेथील काही कार्यक्रमांमध्ये त्या भाग घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत बंगालचे मुख्य सचिव एच.के. द्विवेदी आणि कोलकाता फूटबॉल क्लब मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंगचे पदाधिकारीही विदेश दौऱ्यावर गेले आहेत. 23 सप्टेंबर रोजी ममता बॅनर्जी दुबई येथून कोलकात्यात परतणार आहेत.









