जादवपूर विद्यापीठात तिरंगा फडकविण्यास मनाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देशविरोधी ठरविले आहे. कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठात 9 ऑगस्ट रोजी झालेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणावरून त्यांनी हा आरोप केला आहे. जादवपूर विद्यापीठात तिरंगा फडकविण्यास आणि वंदे मातरम् म्हणण्यास मनाई असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनीच दिली आहे. एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी काश्मिरी युवकाला अटक केली आहे. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सामील राहिले आहेत. ममता बॅनर्जी यांचे सरकार चौकशीच्या नावावर केवळ ढोंग करत आहे. 12 वर्षांच्या शासनकाळात ममता बॅनर्जी यांनी कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच केले नसल्याचा दावा अधिकारी यांनी केला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तसेच एनआयए चौकशी करविली जावी अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बंगालच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावुन विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 4 आठवड्यांमध्ये स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तर राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी 4 सदस्यीय समितीला सोपविली आहे.









