► वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदुद्वेष्ट्या आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्याच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठी दंगल झाली. हजारो हिंदूंना आपली घरेदारे सोडून पलायन करावे लागले. अनेक हिंदूंचे या दंगलीत बळी पडले. तथापि, ममता बॅनर्जी यांनी दंगलग्रस्त भागाला भेट देऊन दंगलग्रस्तांची चौकशी करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. उलट त्यांनी मुस्लीम इमामांची भेट घेऊन त्यांना सहानुभूती दाखविली. यावरुन हिंदूंसंबंधी त्यांच्या भावना काय आहेत ते समजते, असा आरोप या पक्षाने केला आहे.
या दंगलीत दोन हिंदूंना दंगलखोरांनी त्यांच्या घरातून बाहेर खेचून भोसकून त्यांची हत्या केली होती. हे दोन हिंदू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, असे आता स्पष्ट झाले आहे. तथापि, या पक्षाने अद्याप ते आपले कार्यकर्ते आहेत, हे मान्यही केलेले नाही. कारण ते हिंदू आहेत. अशा प्रकारे तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी हे दोन्ही पक्ष हिंदूंच्या द्वेषाचे राजकारण करीत आहेत. हिंदू समाज हे लक्षात घेईलच, असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे.
दंगल का घडली
केंद्र सरकारने केलेल्या वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये मुस्लीमांकडून दंगल घडविली गेली, असा आरोप आहे. मुर्शिदाबाद, मालदा आणि दक्षिण चोवीस परगाणा या तीन जिल्ह्यांमध्ये या दंगलींची सर्वाधिक झळ बसली. विशेषत: मुर्शिदाबाद जिल्ह्यात ती दोन आठवडे सुरू होती. या काळात हजारो हिंदूंची घरे जाळण्यात आली. त्यामुळे त्यांना आपला राहता भाग सोडून माल्दा येथे सुरक्षित स्थानी पलायन करावे लागले आहे. आता परिस्थिती काहीशी निवळली असली, तरी हे हिंदू आपल्या घरांकडे परतण्यास तयार नाहीत. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी दंगलग्रस्त र्म्शिदाबाद जिल्ह्याचा दौरा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांनी तेथील परिस्थितीचे वर्णन भीषण असे केले होते.
महिला आयोगाचीही भेट
दंगलग्रस्त भागाला महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि काही सदस्यांनीही भेट दिली होती. या आयोगासमोर दंगलग्रस्त महिलांनी त्यांची बाजू मांडली. अक्षरश: रडत त्यांनी त्यांच्यावर ओढविलेल्या भीषण परिस्थितीचे वर्णन केले आणि केंद्र सरकारकडे तसेच राज्यसरकारकडे संरक्षणाची मागणी केली होती.
तर त्या धावल्या असत्या…
पश्चिम बंगालमध्ये मुस्लीमांवर असे अत्याचार झाले असते, तर ममता बॅनर्जी लगेच तेथे धावल्या असत्या. त्यांनी मुस्लीमांच्या अधिकारांसाठी आंदोलन केले असते आणि त्या तेथेच ठाण मांडून बसून राहिल्या असत्या. तथापि, या दंगलीत हानी केवळ हिंदूंचीच झाल्याने त्या स्वस्थ आहेत, अशी खोचक टीका पश्चिम बंगालमधली भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते शुभेंदू अधिकारी यांनी केली आहे.
राज्यपाल अहवाल पाठविणार
मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात आपण जे पाहिले, त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. या अहवालात आपण राज्यातील आणि विशेषत: दंगलग्रस्त भागातील वस्तुस्थिती आणि कायदा तसेच सुव्यवस्था स्थितीचा आढावा मांडणार आहोत, असे राज्यपाल आनंद बोस यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारलाही हा अहवाल पाठविण्यात येईल. दंगलग्रस्त भागातील पिडीत लोकांना संरक्षणाची आवश्यकता असून त्यांना धीर देण्याचीही आवश्यकता आहे. राज्य सरकारने हे काम त्वरित करावे, अशी आपली इच्छा आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. हा अहवाल येत्या एक दोन दिवसांमध्ये पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र सरकार या अहवालावर काय भूमिका घेणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना राज्यपाल आनंद बोस करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.









