धोंडू चिंदरकर ; सेवा पंधरावड्याची उद्या पेंडूर मतदारसंघातून सुरुवात
मालवण : प्रतिनिधी
आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवण्याचा निर्धार भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. हॉटेल महाराजा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, पंकज सादये, मंदार केणी, भाई कासवकर, जीवन भोगावकर, महेंद्र चव्हाण, मनोज मेथर, सचिन आंबेरकर, पंकज पेडणेकर, रवींद्र टेंबुलकर, प्रमोद करलकर, रोहन पेंडूरकर, पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, सेजल परब, वैष्णवी मोंडकर, दीक्षा गावकर, अमिता निवेकर, समीक्षा खोबरेकर, रश्मी लुडबे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडाचे नियोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मालवणमध्ये नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात एकूण १२ पंचायत समिती गणांमध्ये सभा घेतल्या जाणार आहेत. यात १४ सप्टेंबर रोजी पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील दोन पंचायत समिती गणांमधून या सभेची सुरुवात होईल. २० सप्टेंबर रोजी मालवण शहरात या सेवा पंधरवड्याची सांगता होणार आहे. या सेवा पंधरवड्यात भाजप कार्यकर्ते वृक्षारोपण आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सेवा पंधरवड्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. घटस्थापनेच्या दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे मालवणचा दौरा करतील. या दौऱ्यात ते जनता दरबार घेऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील. या दौऱ्यात ते विकासात्मक कामांचा आढावा घेण्यासोबतच तालुक्यात नवीन उद्योग आणण्यासाठीच्या शक्यतांवरही चर्चा करतील, असे चिंदरकर यांनी सांगितले.









