कलबुर्गी, यादगिरीतील दोन उमेदवारांसह चौघांना अटक : सहकार्य करणारे पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील विविध पदांसाठी शनिवारी कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत (केपीएससी) राज्यभरात परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी ब्लुटूथ उपकरणाचा वापर केल्याप्रकरणी दोन उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील उमेदवार हे यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणात उमेदवारांना सहकार्य केलेल्या काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
यादगिरी जिल्ह्याच्या अफजलपूर तालुक्यातील सोन्ना येथील पुट्टप्पा हा ब्लुटूथ उपकरणाचा वापर करून परीक्षा देत होता. चौकशीवेळी तो बोगस उमेदवार असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी त्यालासह सहकार्य करणाऱ्या अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यादगिरी शहर पोलीस स्थानकात आणून चौकशी केली जात आहे. पुट्टप्पाजवळील ब्लुटूथ डिव्हाईस आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यादगिरी जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांमध्ये 7884 उमेदवार परीक्षा देत आहेत.
कलबुर्गी शहरातील एस. बी. कॉलेज परीक्षा केंद्रावरही ब्लुटूथ उपकरणाचा वापर करून परीक्षा देणाऱ्या त्रिमूर्ती या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. त्याला बाहेरून सहकार्य करणाऱ्यांचा पोलीस शोध घेण्यात येत असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात किती जणांचा सहभाग आहे, हे अधिक चौकशीनंतरच समजणार आहे.
रुद्रगौडावर संशय
पोलीस उपनिरीक्षपदांच्या नेमणुकीवेळी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणार उमेदवार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह अनेकांना अटक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच केपीएससीमार्फत घेतल्या गेलेल्या विविध पदांच्या परीक्षेवेळी कॉपीसारखे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक नेमणूक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी रुद्रगौडा पाटील याच्यावर संशय बळावला आहे. त्रिमूर्ती याने चौकशीवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे रुद्रगौडाविरोधात कलबुर्गीच्या अशोकनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आवश्यकता भासली तर रुद्रगौडाची चौकशी
केपीएससीने घेतलेल्या परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी आवश्यकता भासली तर रुद्रगौडा पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती कलबुर्गीचे पोलीस आयुक्त आर. चेतन यांनी दिली. रुद्रगौडा याने त्रिमूर्ती याला ब्लुटूथ डिव्हाईस पुरविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे याविषयी अधिक तपास केला जात आहे. तपासानंतर सर्वकाही उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.









