विद्यार्थ्यांकडून आरोप : निवड समिती रद्द करण्याची मागणी : ठोस कारण न देताच संघातून बाहेर
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पुरूष कब्बडी संघाच्या निवड प्रक्रियेत मोठा गलथान कारभार झाला आहे. प्रतिभावंत खेळाडूंना वगळून वसुल्यावर आलेल्या खेळाडूंची निवड केली आहे. सध्या निवड करण्यात आलेला संघ रद्द करून पारदर्शकपणे संघाची निवड करण्यात यावी, अशी मागणी संघातून वगळण्यात आलेला रायबाग तालुक्यातील एसपीएम शारीरिक शिक्षण महविद्यालयाचा विद्यार्थी कांतु कोगे याने केली आहे. कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्याने ही माहिती दिली. या बरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 2023-24 सालाकरिता कब्बडी संघाची निवड करण्यात आली आहे. दि. 1 व 2 नोव्हेंबर रोजी विजापूर येथील बीएलडीई संस्थेच्या ए. एस. पाटील महाविद्यालयात ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या दरम्यान आपलीही त्या संघामध्ये निवड करण्यात आली होती. दोन दिवस झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान संघात निवड करून अचानक वगळण्यात आले आहे. याबाबत निवड समितीचे सदस्य ईश्वर अंगडी, एस. बी. चळगेरी, लक्काप्पा बुद्दण्णावर यांना वगळण्याचे कारण विचारण्यात आले. मात्र कोणतेच ठोस कारण न देता संघातून बाहेर घालण्यात आले आहे.
वसुलेबाजी विद्यार्थ्यांची निवड केल्याचा आरोप
निवड करताना निवड समितीच्या सदस्यांकडून केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली आहे. यामध्ये वसुला लावलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आपणामध्ये प्रतिभा असूनही वगळण्यात आले आहे. वगळण्यासाठी ठोस कारण देण्यात आलेले नाही. मैदानावर खेळ पाहून निवड करण्याची प्रक्रिया असली तरी निवड समितीचे सदस्य मात्र कायम मोबाईलमध्येच गुंतलेले होते. याबाबतचा व्हिडीओही आपल्याकडे उपलब्ध आहे. निवड समितीच्या सदस्यांच्या बेजबाबदारपणाचा आपल्याला फटका बसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यामुळे अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यापीठाची निवड समिती रद्द करून सध्या निवडलेला कब्बडी संघ रद्द करावा व नव्या निवड समितीची नेमणूक करून पारदर्शकपणे संघाची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी श्रीधर खिचडे, अॅड. परशुराम कमते, सोमशेखर बजंत्री आदी उपस्थित होते.









