क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नवी दिल्ली येथे खेलो इंडिया वरिष्ट महिला ज्युडो राष्ट्रीय लीग व अग्रमानांकीत ज्युडो स्पर्धेत बेळगावची आघाडीची ज्युडोपटू मलप्रभा यल्लाप्पा जाधव हिने 48 किलो वजनी गटात जेतेपद पटकावून पुन्हा एकदा कर्नाटकाला सुवर्णपदक मिळवून दिले.
दिल्ली येथील के. डी. जाधव इनडोअर स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया आझादी का अमृत महोत्सव’ महिला लीग व अग्रमानांकित ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या मलप्रभा जाधवने पहिल्या फेरीत झारखंडच्या रियाचा पराभव केला. दुसऱया फेरीत बिहारच्या सुस्मिताचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या हर्षिता बी. हिचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत मलप्रभा जाधवची लढत एसएसबीच्या ओमी हिच्याबरोबर झाली. या लढतीत पहिल्या फेरीत मलप्रभाने केवळ 1 गुणाची आघाडी मिळविली होती. ओमीने मलप्रभाला कडवी लढत दिली. पण दुसऱया फेरीत मलप्रभाने आपल्या अनुभवाच्या जोरावर ओमीवर 4 गुण मिळवून 5-0 च्या आघाडीसह अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत त्रिपुराच्या अस्मिता हिच्याबरोबर कडवी लढत होणार असे वाटत असताना मलप्रभाने आपला खेळ उंचावत 10-0 अशी धूळ चारत सुवर्णपदक पटकाविले. तिला मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मलप्रभा ही बेंगळूर येथे सराव करीत असून, तिला ज्युडो प्रशिक्षक त्रिवेणीसिंग, जितेंद्रसिंग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत असून, वडील यल्लाप्पा, आई शोभा, भाऊ मोहन जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









