नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुढाकार घेणे गरजेचे : 50 वर्षे पूर्ण झाल्याने पूल बनलाय कमकुवत
खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदीवर 1962 साली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने नवा पूल बांधण्यात आला होता. हा पूल आता पन्नास वर्षाचा जुना झाला आहे. परंतु आजही या पुलाला नवा पूल म्हणूनच ओळखले जाते. पन्नास वर्षे झाल्याने पूल काही ठिकाणी कमकुवत झाला आहे. तर पुलावरून नदीत कोणीही पडू नये म्हणून सुरक्षिततेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईपच्या सहाय्याने संरक्षित कठडे बांधण्यात आले होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून या पुलावरील संरक्षित कठडेही नादुरुस्त झाले आहेत. या पुलाची दुरुस्ती कोण करणार? आता नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांचे लक्ष या पुलाच्या दुरुस्तीकडे वेधणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगावहून यल्लापूरला जाण्यासाठी शंभर वर्षापूर्वी खानापूरमार्गे रस्ता काढण्यात आला होता. जांबोटी क्रॉस, नवा मोटार स्टॅन्ड, मलप्रभेच्या जुन्या पुलावरून रूमेवाडी क्रॉसपर्यंत हा रस्ता येत होता. पुढे हा रस्ता पुन्हा नंदगडमार्गे यल्लापूरला जातो. त्यामुळे या रस्त्याला पूर्वी बेळगाव-यल्लापूर रस्ता म्हणून ओळखले जात होते. याच रस्त्यादरम्यान मलप्रभा नदी येत असल्याने सध्याच्या जुन्या पुलाच्या ठिकाणी नदीचे पाणी पलीकडे जाण्यासाठी 14 मुशी असलेले पूल बांधण्यात आले. त्यामुळे हा पूल जुना पूल म्हणून ओळखला गेला.
या पुलामुळे या रस्त्यावरची रहदारी सुरू झाली असली तरी या पुलाची उंची केवळ दहा फुटापर्यंत असल्याने पावसाळ्यात मलप्रभा नदीत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे हा पूल काही दिवस पुराच्या पाण्याखाली जाऊ लागला. त्यामुळे कित्येक दिवस या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत जाऊ लागली. मलप्रभा नदीवर उंचीचा पूल बांधावा व ही समस्या कायमची मार्गी लावावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली. याचा सारासार विचार करून त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्यातून 1962 साली मलप्रभा नदीवर वीस फूट उंचीचा नवा पूल बांधण्यात आला. त्यामुळे कित्येक वर्षे पावसाळ्यात या पुलावर पाणी येत नसल्याने वाहतूक ठप्प होत नव्हती. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी सोयीचा ठरला. हा पूल झाल्याने बेळगावहून मंगळूर, कारवार, यल्लापूर, अळणावर, हल्याळ, दांडेली, रामनगर, कारवार, पणजी, मडगाव आदी भागात होणारी वाहतूक वाढली. बेळगाव-कारवार व बेळगाव-पणजी या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा रस्ता राहिल्याने 1975 साली सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग यांच्या ताब्यात गेला. त्यावेळीपासून बेळगाव-पणजी महामार्ग म्हणूनच या रस्त्याला ओळखले जात होते. त्यामुळे या महामार्गासह मलप्रभेच्या या नव्या पुलाची जबाबदारी त्यांच्यावर गेली.
खानापूर शहराबाहेरून काढण्यात आला नवा महामार्ग
बेळगाव-पणजी या रस्त्यावर वाढलेली वाहतूक पाहता या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र हा रस्ता खानापूर शहराबाहेरून गेला. खानापूर येथील मराठा मंडळ पदवी महाविद्यालयापासून ते गोवा क्रॉसपर्यंत चौपदरी रस्ता काढण्यात आला. रस्त्यादरम्यान पूर्वीच्या जुन्या पुलापासून पूर्वेला काही अंतरावर यावर्षी आणखीन एक महामार्गावर नवे पूल बांधण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून नव्या हायवेवरून वाहतूक सुरू झाली आहे.
नव्या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची
खानापूर शहराबाहेरून काढण्यात आलेल्या चौपदरी महामार्गावरून यावर्षी वाहतूक सुरू झाली असली तरी खानापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होता कामा नये. कारण खानापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण तर आहेच. शिवाय महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. खानापूर शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचा लाभही अनेकांना आहे. त्यामुळे मराठा मंडळ पदवी महाविद्यालयापासून खानापूर शहरातून गोवा क्रॉसला मिळणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. रूमेवाडी क्रॉसपासून गोवा क्रॉसपर्यंत या रस्त्यावर मोठमोठे ख•s पडल्याने हा रस्ताही वाहतुकीस कूचकामी ठरला आहे. शिवाय याच रस्त्यावर कमकुवत स्थितीत असलेला मलप्रभा नदीवरील नवा पूल व नादुरुस्त संरक्षित कठडे याची दुरुस्ती करणे किंवा त्या ठिकाणी नवे पूल बांधणे महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याचा विकास व या ठिकाणी नवे पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करावा म्हणून खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर व भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.









