कणकुंबी ते एम. के. हुबळीपर्यंत तालुक्यातील गावांना समृद्ध करणारी नदी : मान्सून लांबण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाचे सावट
खानापूर : खानापूर तालुक्याला समृद्ध करणारी तसेच ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली नदी म्हणून प्रसिद्ध असलेली मलप्रभा नदी गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खानापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा तसेच सर्वसामान्य जनता आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. यावर्षी वळिवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने तसेच यंदा मान्सून लांबण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात सह्याद्रीच्या कपारीतून जन्म घेतलेली मलप्रभा नदी तालुक्याची जीवनदायिनी बनलेली आहे. कणकुंबी ते एम. के. हुबळीपर्यंत तालुक्यातील गावांना समृद्ध करणारी नदी कोरडी पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीवर बंधारे असूनदेखील योग्य नियोजनाअभावी नदी कोरडी पडली आहे. यात पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. खानापूर शहराला नदीतून जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी जुन्या बंधाऱ्याच्या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपूर्वी नवीन ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला आहे. या ठिकाणी नव्याने बंधारा बांधून उंची वाढवून पाणी अडविण्याची योजना करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत अडवलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने नदीच्या पात्राची खोलीच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक कमी प्रमाणात होत आहे.
गाळ-वाळू पात्रात साचत असल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी
जुन्या चौदा मुशीच्या ठिकाणी पाणी अडविण्यात येत होते. मात्र गाळ साठवून बंधाऱ्याची उंचीच कमी झाल्याने तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी ब्रिजकम बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. आणि नव्याने 16 फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला. पहिल्या चार वर्षांत मोठ्याप्रमाणात पाणी साठवणूक होत होती. मात्र गाळ आणि वाळू पात्रात साचत असल्याने बंधाऱ्याच्या ठिकाणी पुन्हा पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पात्र कोरडे पडले आहे. तसेच यावर्षी वळिवाचा पाऊस झाला नसल्याने याचाही परिणाम नदीच्या प्रवाहावर झाला आहे.
लघुपाटबंधारे खात्याने तातडीने नियोजन करणे गरजेचे
लघुपाटबंधारे खात्याकडून दरवर्षी पाणी अडविण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र नदीपात्रात वाळू आणि गाळ साचून पात्राची खोलीच कमी झाल्याने या ठिकाणी नव्या बंधाऱ्यापासून जॅकवेलपर्यंत नदीपात्राची खोली वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा यावर्षी पावसाळ्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात गाळ साचून पात्राची खोली आणखी कमी होणार आहे. त्यामुळे याचवर्षी लघुपाटबंधारे खात्याने नदीपात्राची खोली वाढविण्याच्या योजना हाती घेणे गरजेचे आहे. घाटाजवळ हत्तीगुंड्याच्या ठिकाणी मोठा कातळ असून हाही कातळ पूर्णपणे काढणे गरजेचे आहे. त्यामुळे पात्राची खोली वाढणार आहे. आणि पाणी साठवणुकीसाठी याचा उपयोग होणार आहे.
नूतन आमदारांनी लक्ष घालून ठोस भूमिका घेणे आवश्यक
मान्सून लांबण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. यावर्षी तालुक्यात वळिवाच्या पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळेही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मलप्रभा नदीवर आमटे, मळव, देवाचीहट्टी, असोगा, खानापूर, कुप्पटगिरी साखर कारखाना, यडोगा असे बंधारे आहेत. मात्र योग्य नियोजन नसल्याने आणि पात्राची खोली कमी असल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सर्वच बंधाऱ्यांच्या ठिकाणी नदीपात्राच्या खोलीचे नियोजन लघुपाटबंधारे खात्याने करणे गरजेचे आहे. या बंधाऱ्यातून कमी पाण्याची साठवणूक होणार आहे. त्यामुळे हे बंधारे अडचणीचे ठरणार आहेत. यासाठी आमदारांनी गांभीर्याने लक्ष घालून ठोस भूमिका घेऊन पाटबंधारे खात्याकडून नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षात हे बंधारे कुचकामी ठरणार आहेत.
खानापूरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा
शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जॅकवेलपासून ते नवीन बंधाऱ्यापर्यंत पूर्णपणे पात्र कोरडे पडल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने जाहीर केले आहे. नदीच्या कोंडीतील साठलेले पाणी जॅकवेलमध्ये आणून हे पाणी शहराला पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र हे पाणी एक आठवडा पुरेल इतकेच असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. शहरात 250 हून अधिक कूपनलिका आहेत. त्याचे योग्य नियोजन नगरपंचायतीने करणे गरजेचे आहे. शहरातील कूपनलिकेची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. यासाठी नगरपंचायतीने तातडीने नियोजन करून शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजनाची गरज आहे. अन्यथा शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे.









