सिद्दगौडा मोदगी यांच्यावर कारवाईची मागणी
बेळगाव : मलप्रभा साखर कारखाना योग्य प्रकारे चालविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना कारखान्याची बदनामी भारतीय कृषक समाज संघटनेचे अध्यक्ष सिद्दगौडा मोदगी हे करत आहेत. त्यांची जी नियुक्ती झाली आहे, ती बेकायदेशीर आहे. तेव्हा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी नेगिल योगी सुरक्षा रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारखान्याचे व्यवस्थापक हे योग्य प्रकारे काम करत आहेत. इरेश हुलीकट्टी हे सध्या कार्यरत आहेत. त्यांचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. असे असताना त्यांची बदली करावी, अशी मागणी करून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्दगौडा मोदगी हे कारखान्याची बदनामी करत आहेत. याचबरोबर अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. काही कर्मचारी व शेतकऱ्यांवर पोलीस स्थानकामध्ये जाऊन गुन्हा दाखल केला आहे. तो चुकीचा आहे. आम्ही त्यांना केवळ कारखाना योग्य चालला आहे. त्यामुळे तुम्ही बदनामी करू नका, असे सांगितले होते. मात्र, आमच्यावर आरोप करत फिर्याद दिली आहे, असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधितावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.









