कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने नागरिकांत संताप : रस्ता आता पूर्णपणे सर्व वाहतुकीस बंद
पेडणे : गेल्या चार दिवसांपूर्वी पेडणे तालुक्यातील मालपे पोरस्कडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील संरक्षक भिंतीवरच दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूची दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने हा रस्ता आता पूर्णपणे सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला. नईबाग-मालपे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 चा बायपास रस्ता मागच्या दोन वर्षांपासून सुरू होता. गेल्यावर्षी याच रस्त्याच्या बाजूला मोठी दरड होती. ती दरड मोठ्या प्रमाणात कोसळली होती. त्यावेळी हा रस्ता सर्व वाहतुकीस बंद असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. परंतु त्यानंतर यंदा या रस्त्याचे उद्घाटनही झाले. त्यानंतर लगेच या रस्त्याच्या बाजूला जी संरक्षकभिंत बांधली होती ती कोसळली. त्यानंतर पुन्हा एकदा दरड मागच्या चार दिवसांपूर्वी कोसळली होती. तर मंगळवार 9 रोजी पहाटे दुसऱ्या बाजूची असलेली दरड मोठ्या प्रमाणात कोसळली. रस्ता मागच्या दोन दिवसापूर्वी बंद ठेवल्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
सध्या हा बायपास रस्ता दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला असून जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 होता तो चालू ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम एमव्हीआर या भाजप सरकारच्या कंत्राटदाराकडून केला जात आहे. या रस्त्याचे बांधकाम करत असताना डोंगर बाजू व्यवस्थित कट न करता अनेक ठिकाणी दगड सरळ रेषेत कापल्यामुळे धोके निर्माण झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ज्या पद्धतीने दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या अनुषंगाने विरोधकांनी नाराजी व्यक्त करून सरकारवर टीका केलेली आहे. ज्यावेळी ही दरड कोसळली. त्याचवेळी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना करून रस्ता दुसऱ्या बाजूने वळविण्याची विनंती केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, हळदोणा आमदार कार्लुस आदी काँग्रेस आमदारांनी भेट दिली आणि सरकारवर टीका करून एमव्हीआर कंपनीच्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची जोरदार मागणी केली होती.
जुना रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
पूर्वीचा जो राष्ट्रीय महामार्ग मालपे ते नईबागपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 17 होता, तो दोन्ही बाजूने चढण असल्यामुळे मोठी वाहने चालवताना अडचणी येत होत्या आणि ठिकठिकाणी वळणही होते. याची दखल घेत सरकारने या भागातील बायपास रस्ता केला होता. परंतु बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दरडी कोसळल्यामुळे नवीन राष्ट्रीय महामार्ग बायपास रस्ता बंद केला आणि आता सर्व वाहतुकीसाठी जुना राष्ट्रीय महामार्ग 17 जो पूर्वीचा होता तो चालू केलेला आहे. सध्या येताना जाताना दोन्ही बाजूने चढण मिळत असल्यामुळे वाहनांना गाडी चालवताना बरीच कसरत करावी लागत आहे. एमव्हीआर कंपनीने हा राष्ट्रीय महामार्ग तयार करताना आजपर्यंत कोणत्याही स्थानिक पंचायतीला, स्थानिक आमदारांना, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केंद्र सरकारच्या अधिकाराचा वापर करत या रस्त्याचे काम मनमानी पद्धतीने केले आहे.