प्रतिनिधी/ बेळगाव
माळमारुती पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर 27 क्विंटलहून अधिक रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. यासंबंधी शहापूर येथील एका युवकावर अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बसवाण्णा ट्रेडर्सजवळ ही कारवाई केली आहे. केए 22 डी 7593 क्रमांकाच्या टाटा इंट्रा वाहनातून रेशनच्या तांदळाची वाहतूक करण्यात येत होती. वाहन अडवून 2 लाख 75 हजार 611 रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहापूर येथील विनोद चौगुला याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









