प्रशांत लायंदर मालिकावीर, नरेंद्र मांगोरे सामनावीर, सिगन संघ उपविजेता
बेळगाव : माळमारुती स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित माळमारुती चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने सिगन संघाचा 26 धावांनी पराभव करून माळमारुती चषक पटकाविला. प्रशांत लायंदर मालिकावीर तर नरेंद्र मांगोरेला सामनावीराने गौरविण्यात आले. माळमारुती येथे आयोजित केलेल्या माळमारुती चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 180 धावा केल्या. त्यामध्ये नरेंद्र मांगोरेने 2 षटकार, 11 चौकारासह 80, गुरुप्रसाद पोतदारने 1 षटकार, 5 चौकारासह 30 धावा केल्या. सिगनतर्फे चेतन दोडमनीने 34 धावात 3, सचिन कुलकर्णी, राहुल बजंत्री, प्रकाश पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिगन संघाने 20 षटकात 7 गडी बाद 154 धावाच केल्या. त्यात भावित पुजारीने 1 षटकार, 5 चौकारासह 46, विजय कुरीने 1 षटकार, 1 चौकारासह 43, तर संजय पुरोहितने 4 चौकारासह 22 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्जतर्फे शिवाजी पाटीलने 11 धावात 3, वासीम धामणेकरने 33 धावात 2 तर नरेंद्र मांगोरे व मिलिंद बेळगावकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अॅङ कुंगाले, शंकर पाटील, एन. बी. पाटील, प्रणय शेट्टी, पुणित शेट्टी व राघवेंद्र यांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी किंग्ज संघाला व उपविजेत्या सिगन संघाला चषक रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर नरेंद्र मांगोरे, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर प्रशांत लायंदर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रिकट शौकीन उपस्थित होते.









