गेल्या काही महिन्यांपासून जातीय दंगलींना तोंड द्यावे लागलेल्या मणिपूरला संसदेत चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन या मुद्द्यावर देशाच्या राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजप विरोधी इंडिया या आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना केली. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी आज राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, कॉंग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्याची मुख्य मागणी केली असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, “इंडिय़ा आघाडीच्या 31 सदस्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. मणिपूरला भेट दिलेल्या 21 खासदारांच्या शिष्टमंडळाने त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. आम्ही राष्ट्रपतींना निवेदनही सादर केले आहे. विशेषतः त्यांना महिलांवरील अत्याचार, पुनर्वसन आणि मणिपूरमधील इतर परिस्थितींबद्दलही माहिती दिली. पंतप्रधानांनी मणिपूरला भेट द्यावी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले उचलावीत ही आमची प्रमुख मागणी आहे.” असेही खर्गे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “इंडिया आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची मागणी करत आहोत. पण नियम 267 अन्वये सभागृहाचे इतर सर्व कामकाज स्थगित केल्यानंतर चर्चा यावर झाली आहे. म्हणून सत्ताधारी पक्षाला मणिपूरवर अल्पकालीन चर्चा हवी आहे ज्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील.”