वृत्तसंस्था/ चेन्नई
शनिवारी येथे झालेल्या राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत मलकितसिंगने आरएसपीबीच्या ई. पांडुरंगचा पराभव करत राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. भारताच्या पंकज अडवाणीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सदर स्पर्धा 6 रेड पद्धतीने खेळविली गेली. मलकितसिंगने अंतिम लढतीत पांडुरंगचा 7-5 अशा फ्रेंम्समध्ये पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. हा अंतिम सामना 13 फ्रेम्सचा खेळवला गेला. या स्पर्धेत भारताचा आणखी एक विश्वविजेता स्नूकरपटू पंकज अडवाणीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मलकितसिंगने उपांत्य सामन्यात पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. तर पांडुरंगने आदित्य मेहतावर उपांत्यफेरीच्या सामन्यात 6-4 अशा फ्रेम्समध्ये मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या सहा रेड स्नूकर विभागात कर्नाटकाची विद्यमान विजेती विद्या पिल्ले तसेच 21 वर्षाखालील वयोगटातील स्नूकर चॅम्पियन कर्नाटकाची किर्तना पंडीयान व तामिळनाडूची अनुपमा रामचंद्रन यांच्यात जेतेपदासाठी चूरस राहिल.









