जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची केली मागणी
बेळगाव : महामार्ग रुंदीकरणासाठी दुसऱ्यांदा जमीन संपादन करण्यात येत असल्याने कोगनोळी येथील माळी कुटुंबीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. माळी कुटुंबीयांनी न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. योग्य न्याय न मिळाल्यास जमीन संपादन करण्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोगनोळी येथील सर्व्हे क्रमांक 649 हिस्सा क्रमांक 7 मधील 12 गुंठ्यापैकी 7 गुंठे जमीन 2002 मध्ये महामार्ग रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली आहे. तर उर्वरित 5 गुंठ्यापैकी 2 गुंठ्यामध्ये माळी कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. यामध्ये चार कुटुंबीयांचे वास्तव्य असून सर्वांचे लहान लहान व्यवसाय आहेत. यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. असे असताना प्राधिकरणाकडून पुन्हा पाच गुंठे जमीन संपादित करण्यात येत आहे. यामुळे माळी कुटुंबीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असून बेघर व्हावे लागणार आहे. या जमिनी संपादनाला आपला तीव्र विरोध असून या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी जमीन संपादन करून आपल्यावर अन्याय करण्यात आला आहे. जर जमीन संपादन झाल्यास कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे. सध्या असलेल्या व्यवसायानुसार व्यवसाय उभारण्यासाठी मदत करावी. गमावलेल्या जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी माळी कुटुंबीयांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. माळी कुटुंबीयांचा हॉटेलचा व्यवसाय असताना प्राधिकरणाकडून शेजारीच हॉटेल सुरू करण्यात आले आहे. यामुळेही आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. जमीन संपादन करण्यास तीव्र विरोध आहे. याबाबत बेळगाव येथील महामार्ग भूसंपादन प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच धारवाड येथील प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांकडेही तक्रार दिली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपल्यावर अन्याय करण्यात येत असून न्याय द्यावा, अशी मागणी माळी कुटुंबीयांनी केली आहे.









