न्हावेली /वार्ताहर
मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावांनी पारंपरिक एकोपा जपत दसरोत्सव उत्साहात साजरा केला. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला मंगलमय वातावरण लाभले.शिवलग्न सोहळा हा यावर्षीचा मुख्य आकर्षण ठरला. दोन गावच्या मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. संध्याकाळी ५ वाजता शिवलग्नानंतर देवीची पालखी व तरंगकाठी ढोल-ताशांच्या गजरात निघाली. त्यानंतर रंगलेल्या सोने लुट कार्यक्रमात भाविकांनी देवाला अर्पण करून आशीर्वाद घेतला.श्री देव रवळनाथ मंदिर आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविण्यात आले होते.भाविकांनी नारळ, केळी अर्पण करून देवाचे दर्शन घेतले. अखेरीस सामूहिक गाऱ्हाण्याने दसरो सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यातून मळगाव व सोनुर्ली गावांचा एकोप्याचा आणि बंधुत्वाचा आदर्श जिल्ह्यात ठळकपणे दिसून आला.









