19 जिल्ह्यातील 697 बूथवर पुन्हा मतदान
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पंचायत मतदानावेळी झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने काही बूथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी पश्चिम बंगालमधील 19 जिल्ह्यांमधील निवडक 697 बूथवर फेरमतदान पार पडले. या मतदानावेळीही काही भागात गैरप्रकार घडल्याचे दिसून आले आहे. जलपैगुडीतील जुम्मागच येथील मतदान केंद्रावर एक महिला दुसऱ्या महिलेला मतदान करण्यासाठी मदत करताना दिसली. एकाचवेळी दोन महिला एकत्रितपणे मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राज्यातील 74 हजार पंचायतींसाठी शनिवारी झालेल्या मतदानावेळी ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान हाणामारी, जाळपोळ, मारामारी, मतपेट्या लुटण्याच्या घटना समोर आल्या. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही बरेच झाले होते. या गैरप्रकारानंतर निवडणूक आयोगाने 697 बूथवर फेरमतदान घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पश्चिम बंगालमधील पुऊलिया, बीरभूम, जलपैगुडी आणि दक्षिण 24 परगणा येथे मतदान घेण्यात आले. सोमवारी झालेल्या निवडणुकीत मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक 175 बूथ होते. तर मालदामध्ये 110 बूथवर मतदान पार पडले. ज्या बूथवर मतपेटी छेडछाड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या, त्या बूथवरच फेरमतदान घेण्यात आले.
#
पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी भाजपने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. हे पथक पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त भागांना भेट देणार आहे. या पॅनलमध्ये भाजप खासदार रविशंकर प्रसाद, सत्यपाल सिंह, राजदीप रॉय आणि रेखा वर्मा यांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस नवी दिल्लीत पोहोचले असून ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दोघांमध्ये निवडणुकीतील हिंसाचारावर चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
मुर्शिदाबादमध्ये सापडले 35 क्रूड बॉम्ब
निवडणूक काळात मुर्शिदाबादमधील तलावात 35 क्रूड बॉम्ब सापडले. मुर्शिदाबादच्या बेलडांगा भागात पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तलावातून आणि शेतातून 35 क्रूड बॉम्ब सापडले आहेत. बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करून धोका टाळण्यात आला.









