वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या राष्ट्रध्वजासंबंधी अवमानजनक टिप्पणी केल्याच्या संदर्भात मालदीवच्या मंत्री मारियम शिऊना यांनी भारताकडे क्षमायाचना केली आहे. हा प्रकार ‘चुकून’ घडल्याची सारवासारवीही त्यांनी सोमवारी केली. त्यांच्या टिप्पणीवर भारताने तीव्र असंतोष व्यक्त केला होता. त्यानंतर शिऊना यांनी सोशल मिडियावर टाकलेली ही पोस्ट डिलीट केलेली होती. तरीही भारताचे समाधान न झाल्याने अखेर त्यांना क्षमायाचना करावी लागली आहे. अद्यापही या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत.
मालदीवमध्ये सध्या तेथील संसदेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. ही निवडणूक तेथील सत्ताधारी अध्यक्ष आणि तेथील विरोधी पक्ष यांच्यासाठी महत्वाची आहे. विरोधी पक्षांच्या एका पोस्टमध्ये सत्ताधारी अध्यक्षांच्या पक्षाच्या विरोधात काही टिप्पणी करण्यात आली होती. या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना शिऊना यांनी भारताच्या राष्ट्रध्वजावर असणाऱ्या अशोक चक्राच्या चित्रावर काही अवमानजक टिप्पणी केली. त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टिकेचा भडीमार सुरु झाला.
माहिती नसल्याची सारवासारवी
आपले विरोधी पक्षांना प्रत्युत्तर ज्या चित्रावर आपण टाईप केले ते भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोक चक्र होते, याची आपल्याला माहिती नव्हती. मात्र, आपल्या या कृतीमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची आपण क्षमा मागत आहोत. आपण ही पोस्ट यापूर्वीच डिलीट केली आहे, असे निवेदन शिऊना यांनी प्रसिद्ध केले आहे. या प्रकरणावर पडदा पडावा, अशी त्यांची इच्छा आहे. मालदीव भारताशी असलेल्या मैत्रीचा आणि संबंधांचा आदर करतो. यापुढे आपल्या हातून अशी चूक होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे शिऊना यांनी त्यांच्या क्षमायाचना संदेशात स्पष्ट केले आहे. याच शिऊना यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधात अभद्र टिप्पणी केल्याने पूर्वीही एकदा मंत्रिमंडळातून, अन्य दोन मंत्र्यांसह निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली.









