अध्यक्षपदी निवडून आलेल्या मुइज्जू यांची घोषणा
वृत्तसंस्था/ माले
मालदीवचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले मोहम्मद मुइज्जू यांनी देशात तैनात 70 भारतीय सैनिकांना परत जाण्यास सांगणार असल्याचे वक्तव्य केले आहे. मालदीव पूर्णपणे स्वतंत्र होऊ इच्छितो. मालदीवमध्ये तैनात कुठल्याही देशाच्या सैनिकांसाठी आमची प्रतिक्रिया अशाचप्रकारची असणार आहे. भारतीय सैनिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी आम्ही भारत सरकारसोबत बोलणी सुरू केली असल्याचे मुइज्जू यांनी म्हटले आहे.
भारताच्या सैनिकांना मालदीवमधून बाहेर काढण्याबद्दल बोलतोय याचा अर्थ आम्ही त्यांच्या जागी अन्य कुठल्या देशाचे सैनिक येथे बोलावू असा नाही. चीन किंवा अन्य कुठल्याही देशाचे सैनिक आमच्या भूमीवर असणार नाहीत असा दावा मुइज्जू यांनी केला आहे.
दोन्ही देशांना लाभ होईल अशाप्रकारचे संबंध आम्ही भारतासोबत बाळगू इच्छितो असे मुइज्जू यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले मुइज्जू हे 15 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
भारताने मालदीवला 2010 आणि 2013 मध्ये दोन हेलिकॉप्टर्स आणि 2020 साली एक छोटे विमान प्रदान केले होते. यावरून मालदीवमध्ये मोठा गदारोळ झाला होता. मुइज्जू यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने तत्कालीन अध्यक्ष सोलिह यांच्यावर ‘इंडिया फर्स्ट’ धोरण स्वीकारल्याचा आरोप केला होता.
मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रदान करण्यात आलेल्या विमानाचा वापर शोध-बचाव मोहीम आणि रुग्णांच्या वाहतुकीसाठी करणे अपेक्षित असल्याचे भारताचे सांगणे हेते. या विमानाचे संचालन आणि त्याच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याचे 70 हून अधिक सैनिक मालदीवमध्ये तैनात असल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली होती. यानंतर मालदीवच्या विरोधी पक्षांनी ‘इंडिया आउट’ मोहीम सुरू केली होती.









