वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी मालदीवचे संरक्षणमंत्री मोहम्मद घासन मौमून हे बुधवारपासून भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. मौमून हे नवी दिल्लीत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत व्यापक चर्चा करणार आहेत. मालदीवच्या मंत्र्याचा हा दौरा चीनसमर्थक अध्यक्ष मोहम्मद मुइज्ज्जू यांच्यामुळे भारतीय सैनिकांना मालदीव सोडावा लागल्याच्या 8 महिन्यांनी होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 8 जानेवारी रोजी नवी दिल्लीत मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार असल्याची माहिती भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा दलांची क्षमता वाढविण्यासोबत संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्यासाठी प्रशिक्षण, सरावावर चर्चा करतील. संरक्षण प्रकल्पांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंची समीक्षा या बैठकीत केली जाणार आहे.
मालदीव भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणात विशेष स्थान राखून असून याचा उद्देश हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धी आणणे आहे. दोन्ही देश आयओआरची सुरक्षा कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच क्षेत्रात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाच्या (एसएजीएआर) भारताच्या दृष्टीकोनात योगदान देत असल्याचे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
गोवा, मुंबईला देणार भेट
मौमून हे गोवा तसेच मुंबईचा देखील दौरा करणार आहेत. मालदीव हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या प्रमुख सागरी शेजाऱ्यांपैकी एक असून सरंक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रांसमवेत समग्र द्विपक्षीय संबंधांमध्ये आता प्रगती दिसून येत आहे.
तणाव दूर होण्यास मदत
यापूर्वी चीनसमर्थक मुइज्जू यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये मालदीवचे अध्यक्षपद सांभाळल्यावर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या काही तासातच त्यांनी मालदीवमधून भारतीय सैनिकांना परत बोलाविण्याची मागणी भारताकडे केली होती. यानंतर भारतीय सैनिकांची जागा भारतीय तज्ञांनी घेतली होती. तर ऑक्टोबर 2024 मध्ये दिल्ली दौऱ्यादरम्यान मुइज्जू यांनी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्याची भूमिका घेतल्यावर तणाव दूर होण्यास मदत झाली होती.









