चीनविरुद्ध टी-20 सामन्यात 8 धावांत 7 बळी घेण्याची कामगिरी
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा तुटवडा नाही. रोजच्या रोज काही ना काही नवे विक्रम रचले जातात. मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा जागतिक विक्रम रचला गेला आहे. क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या मलेशियाच्या वेगवान गोलंदाजानं हा विक्रम केला आहे.
सयाझरुल इद्रुस हा आंतरराष्ट्रीय टी 20 पुरूष क्रिकेट सामन्यामध्ये 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने चीनविरूद्धच्या सामन्यात 8 धावात 7 विकेट्स घेण्याचा मोठा कारनामा केला. टी-20 वर्ल्डकप आशिया बी पात्रता फेरीतील सामन्यात इद्रुसच्या या भन्नाट कामगिरीच्या जोरावर मलेशियाने चीनवर आठ विकेट्सनी दमदार विजय मिळवला. हा चीनचा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. टी-20 च्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत सर्वाधिक 6 बळींचा विक्रम आहे. तब्बल 11 गोलंदाजांनी आतापर्यंत ही कामगिरी केली आहे. इद्रुसने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत चीनच्या फलंदाजीला खिंडार पाडले. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम नायजेरियाच्या पीटर इहोच्या नावावर आहे. त्याने पाच धावांत सहा बळी घेतले आहेत. क्रिकेटमधील जुन्या आणि चॅम्पियन देशांच्या संघाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या नावे आहे. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने सात धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. मात्र, इद्रुसने सगळ्यांना मागे टाकत 7 विकेट घेत जागतिक विक्रम नोंदवला आहे.
असा रंगला चीन-मलेशियाचा सामना
नाणेफेक जिंकल्यानंतर चीनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चीनची सुरुवात खूपच संथ होती. धावफलकावर 12 धावा लागेपर्यंत चीनने एकही गडी गमावला नव्हता. मात्र, इद्रुसने 4 षटकांत आठ धावांत 7 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यातील एक षटक निर्धाव होते. चीनचा संपूर्ण संघ अवघ्या 23 धावांत बाद झाला. प्रत्युत्तरादाखल मलेशियाने 4.5 षटकांत दोन गडी गमावून 24 धावा करत हा सामना जिंकला. इद्रुसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, इद्रुसने गोलंदाजीत नवीन विक्रम करत सर्वच्या सर्व सातही खेळाडूंना त्रिफळाचीत म्हणजे क्लीन बोल्ड केले. त्याच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर चीनच्या फलंदाजांसमोर उत्तर नव्हते. सियाजरुलने आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने एकूण 47 विकेट्स घेतल्या आहेत.









