वृत्तसंस्था / राजगीर (बिहार)
2025 च्या पुरूषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशिया आणि कोरिया दोन संघांनी ब गटातील झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवित सुपर-4 फेरीमध्ये प्रवेश केला.
सोमवारी झालेल्या या स्पर्धेतील ब गटातील एका सामन्यात मलेशियाने चीन तैपेईचा 15-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत सुपर-4 फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. या गटातील दुसऱ्या एका सामन्यात कोरियाने बांगलादेशचे आव्हान 5-1 असे संपुष्टात आणत सुपर -4 फेरी गाठली आहे. ब गटातील गुण तक्त्यात मलेशियाने आपले तिन्ही सामने जिंकत आघाडीचे स्थान मिळविले आहे. कोरियाने या गटातून सहा गुणांसह दुसरे तर बांगलादेशने तीन गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. या गटात चीन तैपेईला एकही सामना जिंकता न आल्याने त्यांना खाते उघडता आले नाही.
सोमवारी खेळविण्यात आलेल्या ब गटातील दुसऱ्या सामन्यात मलेशियाने चीन तैपेईवर 15 गोल करत एकतर्फी विजय मिळविला. चीन तैपेईला शेवटपर्यंत या सामन्यात आपले खाते उघडता आले नाही. मलेशियातर्फे अखिमुल्ला अनूरने 10 व्या, 20, 45 आणि 56 व्या मिनिटाला असे चार गोल नेंदविले. अशरन हमसेनीने 8, 15, 32 आणि 54 व्या मिनिटाला असे चार गोल केले. नूरशफीक सुमांत्रीने 20, 40 आणि 60 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदविले. अबु कमाल अझराईने 22, इफेर युनुसने 24 व्या मिनिटाला तर यमान रोझमीने 32 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
सोमवारी ब गटातील खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कोरियाने बांगलादेशचे आव्हान 5-1 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. कोरिया हा या स्पर्धेतील विद्यामन विजेता आहे. कोरिया संघातील डेन सॉनने नवव्या आणि अकराव्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर सेंगवू ली ने 16 व्या, सेयाँग ओहने 22 व्या मिनिटाला तर जीहून यांगने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. बांगलादेशतर्फे एकमेव गोल 22 व्या मिनिटाला सोबुजने केला.
सामन्यांचे निकाल
मलेशिया – चीन तैपेई
15 0
कोरिया – बांगलादेश
5 1









