वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया)
आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सुपर-4 गटातील मलेशिया आणि भारत यांच्यातील रोमांचक सामना 3-3 असा गोलबरोबरीत राहिला. या सामन्यात मलेशियाच्या रहीमने पेनल्टी कॉर्नरवर तीन गोल नेंदवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर भारताने पिछाडीवरून मुसंडी मारत हा सामना बरोबरीत सोडविला.
रविवारच्या सामन्यात मलेशियातर्फे रहीमने 12 व्या, 21 व्या, 56 व्या मिनिटाला असे तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. भारतातर्फे विष्णुकांत सिंगने 32 व्या मिनिटाला, एस.व्ही. सुनीलने 53 व्या मिनिटाला आणि निलम झेसने 55 व्या मिनिटाला गोल केले. शनिवारी या स्पर्धेत सुपर-4 फेरीतील झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. सुपर-4 फेरीतील अन्य सामन्यात दक्षिण कोरियाने जपानचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत 4 गुण मिळविले. तत्पूर्वी दक्षिण कोरियाने सुपर-4 फेरीतील मलेशियाबरोबरचा आपला सामना 2-2 असा बरोबरीत राखला होता. सुपर-4 फेरीतील गुणतक्त्यात दक्षिण कोरिया सरस गोल सरासरीच्या जोरावर पहिल्या, भारत दुसऱया स्थानावर आहे. जपानने दोन सामने गमविल्याने त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता येणार नाही तर मलेशियाला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता शेवटच्या सामन्यात जपानला मोठय़ा गोलफरकाने पराभव करावा लागेल.
रविवारच्या सामन्यात मलेशियाने सुरूवातीपासूनच आक्रमक चाली करत भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. सहाव्या मिनिटाला मोहम्मद हसनचा फटका भारतीय गोलरक्षक सुरज करकेराने थोपविला. दरम्यान मलेशियाला यावेळी पेनल्टी कॉर्नर मिळाला पण करकेराने मलेशियाच्या फझलचा फटका रोखल्याने त्यांना आपले खाते उघडता आले नाही. 12 व्या मिनिटाला मलेशियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि रहीमने आपल्या संघाचे खाते उघडले. 21 व्या मिनिटाला मलेशियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रहीमने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत मलेशियाने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर विष्णुकांत सिंगने सामन्यातील 32 मिनिटाला भारताचे खाते उघडले. विष्णुकांत सिंगने हा गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. भारताला 49 व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले. 53 व्या मिनिटाला एस.व्ही. सुनीलने भारताचा दुसरा गोल केला. 55 व्या मिनिटाला निलम झेसने भारताचा तिसरा गोल नोंदवून मलेशियावर आघाडी मिळविली पण 56 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नवर रहीमने मलेशियाचा तिसरा गोल नेंदवून हा सामना बरोबरीत राखला.









