वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
मल्याळी अभिनेत्री रंजूषा मेनन घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. 35 वर्षीय अभिनेत्री तिरुअनंतपुरम येथील स्वत:च्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली आहे. रंजूषा ही मल्याळी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री होती. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही सीरियल्समध्ये काम केले होते. रविवारीच तिने सोशल मीडियावर एक रील शेअर केला होता. यानंतर असे काय घडले ज्यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
रंजूषा मेनन मागील काही काळापासून पती आणि मुलांसमवेत श्रीकार्यममध्ये राहत होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेत्रीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपासास प्रारंभ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी रंजूषाचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर तिच्या सहकलाकारांकडेही चौकशी करण्यात येणार आहे.









