शहरासह ग्रामीण भागात जनजागृती मोहीम : जिल्हय़ात मलेरियाचे 2 तर डेंग्यूचे 21 रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
डेंग्यू, मलेरिया हा आजार 2025 पर्यंत पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कंबर कसण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हे उद्दिष्ट निश्चित केले असून बेळगाव जिह्यात याची जनजागृती केली जात आहे. प्रत्येक घरात जाऊन संशयितांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे निश्चितच लवकरात लवकर या दोन्ही साथीच्या आजारांना प्रतिबंध केला जाईल, असा विश्वास जिल्हा सांसर्गिक रोग निर्मूलन अधिकारी डॉ. एम. एस. पल्लेद यांनी व्यक्त केला.
माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील माहिती दिली. सध्या जिह्यामध्ये जानेवारी ते मेपर्यंत 1 लाख 80 हजार 277 जणांची मलेरिया तपासणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 292 जणांची डेंग्यू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 21 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
ग्रा.पं. माध्यमातून जनजागृती
केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने 2017 पासून मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधक मोहीम संपूर्ण देशात राबविली जात आहे. त्याला बऱयापैकी यश आले आहे. याबाबत जनजागृती दरवषी केली जाते. डेंग्यूचा एखादा डास पाण्यामध्ये असेल तर तो सात ते दहा दिवसांत 350 डास निर्माण करतो. त्यासाठी साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडले पहिजेत. त्यासाठी ही जनजागृती सुरू आहे. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिह्यात 179 प्राथमिक आरोग्य केंदे आहेत. त्या प्रत्येक केंद्रामध्ये गप्पी माशांच्या पालनासाठी टाकी बांधण्यात येणार आहे. प्रत्येक टाकीला 15 हजार प्रमाणे खर्च दिला जात आहे. जून महिना हा मलेरिया प्रतिबंधक महिना म्हणून पाळला जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिह्यात एकूण 3 हजार 800 आशा कार्यकर्त्या आहेत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनानुसार दिवसाला 40 घरांमध्ये जाऊन मलेरिया व डेंग्यूच्या संशयित रुग्णांची तपासणी करतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









