हे सूत्रसंचालकाचे लक्षण : गिरीश वेळगेकर यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
सूत्रसंचालक हा श्रोता आणि वक्ता यांच्यातील दुवा असतो. कुठलाही कार्यक्रम सुसूत्रित आणि रंजक बनविण्याची क्षमता त्याच्यात असावी लागते. सूत्रसंचलन ही कला आहे आणि सभा जिंकणे हे यशस्वी सूत्रसंचालकाचे लक्षण असते असे उद्गार ज्येष्ठ सूत्रसंचालक गिरीश वेळगेकर यांनी कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळाने आयोजित केलेल्या सूत्रसंचालन कौशल्य कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी केले.
फोंडा येथील बाबय प्रभू स्मृती भवनच्या सभागृहात ज्ञातीबांधवांसाठी आयोजित केलेल्या सूत्रसंचालन कार्यशाळेत दुर्गाकुमार नावती व दया तेंडुलकर व्यासपीठावर हजर होते. कार्यशाळेचे उद्घाटन मंडळाचे कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, अध्यक्ष विश्वनाथ प्रभू तसेच उपाध्यक्ष व माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते करण्यात आले.
दया तेंडुलकर म्हणल्या, पूर्वतयारी आणि प्रसंगावधान सूत्रसंचालन करणाऱ्या प्रतिभावंतासाठी अत्यंत गरजेचे असून निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि बौद्धिक याची सूत्रसंचलनात प्रक्रियेत कसोटी लागते. सूत्रसंचलक निडर असावा आणि त्याचे वक्तव्य हे प्रसंगानुऊप असावे. विपर्यस्त आणि अवास्तव बोलणे सूत्रसंचलन करणाऱ्यांनी टाळले पाहिजे.
दुर्गाकुमार नावती यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सूत्रसंचलनाचे महत्त्व, सद्यस्वऊप आणि संयोजन यावर विस्तृतपणे भाष्य करताना सभाधीटपणा, आकलनशक्ती, व्यासपीठाचे नियम, ध्वनी संयोजन, औचित्य, उपयुक्त वेशभूषा, संवादामधील चढउतार भाषाशुद्धता, संवाद क्षमता, संवादाची पट्टी, आवाजातील मांर्दवता, स्वानुभव यावर विस्ताराने मार्गदर्शन केले.
आयोजक आणि सूत्रसंचलक यामध्ये समन्वय अत्यंत गरजेचा असतो. क्वचित प्रसंगी गुन्हेगार व्यक्तीसुद्धा एखाद्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थित असल्यास तिच्याबद्दल गौरवास्पद बोलणे हा व्यावसायिकतेचा भाग असल्याचे श्री. नावती म्हणाले.
पांडुरंग पाटील यांच्याहस्ते दया तेंडुलकर व दुर्गाकुमार नावती यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. एकूण तेहतीस प्रशिक्षणार्थीनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थीनी सूत्रसंचलनाची प्रात्यक्षिके सादर केली. पांडुरंग पाटील यांनी स्वागत तर कृपेश पाटील यांनी आभार मानले.









