विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा निर्णय : सेमीस्टर परीक्षा अनुत्तीर्ण होणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ठरणार वरदान
वार्ताहर /मच्छे
सेमीस्टर परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या तसेच विविध कारणांमुळे परीक्षा न दिलेल्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) प्रथमच मेकअप परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बीई सेमीस्टर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विषय सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षभर थांबावे लागणार नाही. तसेच ही मेकअप परीक्षा म्हणजे दुसरा प्रयत्न असे समजले जाणार नाही. विद्यार्थी किती वेळाही अनुत्तीर्ण झाला तरी त्याचा कोठेच उल्लेख असणार नाही. त्यामुळे ही परीक्षा बीई विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे.\ सध्या या परीक्षा केवळ खासगी आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्येच घेतल्या जात असून, 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ स्तरावर या परीक्षा सुरू करण्याचा व्हीटीयूचा विचार आहे. व्हीटीयूच्या सूत्रांनी सांगितले की, मेकअप परीक्षेचा प्रस्ताव जवळपास मंजूर होण्याची शक्यता आहे. विद्यापीठांतर्गत एकूण 219 महाविद्यालये असून त्यापैकी केवळ 25 स्वायत्त महाविद्यालये, 19 शासकीय महाविद्यालये आणि 182 खासगी महाविद्यालये आहेत. सध्या ही सुविधा केवळ स्वायत्त महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहे.
मेक अप परीक्षा म्हणजे काय?
जर एखादा विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत नापास झाला किंवा परीक्षेला बसू शकला नाही तर त्याला ती परीक्षा देण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागते. म्हणजेच पहिल्या सेमीस्टरच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला तीच परीक्षा पास होण्यासाठी तिसऱ्या सेमीस्टरपर्यंत थांबावे लागते. परंतु, नवीन नियमानुसार कोणत्याही सेमीस्टर परीक्षेच्या दोन महिन्यांच्या आत मेकअप परीक्षा होणार आहे. सेमीस्टर परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, आजारपणासह वैयक्तिक कारणांमुळे परीक्षेला उपस्थित राहू शकला नाही किंवा परीक्षेत मिळालेले गुण समाधानकारक नसल्यास मेकअप परीक्षा घेतली जाऊ शकते. तसेच एका सेमीस्टरमध्ये 8 विषय असल्यास मुख्य परीक्षेत 4 विषय आणि मेकअप परीक्षेत 4 विषय उत्तीर्ण होऊ शकतात. मेकअप परीक्षा हा दुसरा प्रयत्न म्हणून समजला जाणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी काय फायदे
नवीन नियमानुसार विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही. तसेच मेक परीक्षा हा दुसरा प्रयत्न मानला जात नाही. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याने किती प्रयत्न केले याचा हिशेब राहणार नाही.
लवकरच याबाबत निर्णय
सध्या स्वायत्त महाविद्यालयांमध्ये मेकअप परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे. याच धर्तीवर अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्येही ही परीक्षा राबविण्याचा विचार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
-व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. विद्याशंकर एस.









