प्रवास प उपलब्ध करणारे गोवा पहिले राज्य : मल्टिमोडल मोबाईल ॲप, पात्रांवर योजना सुरू
प्रतिनिधी / पणजी
सरकारने गोवा माईल्समार्फत सुरू केलेल्या मल्टिमोडल मोबाईल ॲपमुळे आता राज्यातील सर्व नागरिकांना घरबसल्या बस प्रवासाचे तिकिट आरक्षण, टॅक्सी, रिक्षा व पायलट सुविधा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आता घरबसल्या नागरिक आपल्याला प्रवासासाठी सर्व सुविधा प्राप्त करू शकतात. गोवा माईल्समार्फत मल्टिमोडल मोबाईल ॲप लॉचिंग झाल्याने ही सुविधा देणारे गोवा हे देशातील प्रथम व एकमेव राज्य ठरले आहे. त्याचा लाभ राज्यातील जनतेला दीर्घकालीन होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथील कदंब बसस्थानक परिसरात गोवा माईल्स या खासगी कंपनीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मल्टिमोडल मोबाईल ॲप लॉचिंग कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, उपाध्यक्ष क्रितेश गावकर, कदंब महामंडळाचे व्यवस्थापक संजय घाटे, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, संचालक उज्वला नाईक, प्लॅनिंग ॲण्ड स्टॅटीस्टिकचे संचालक विजय सक्सेना, गोवा माईल्सचे प्रमुख उत्कर्ष दाबाडे उपस्थित होते.
सवलतीत देणार मोटरसायकल, रिक्षा, टॅक्सी
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोव्यातील टॅक्सी, रिक्षा व मोटरसायकल पायलट बांधव यांचे पर्यटनासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांची जुनी वाहने सरकार घेऊन त्यांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक वाहने देणार आहे. 150 युवकांना फ्री ऑफ कॉस्ट स्वऊपात टॅक्सी पुरविण्यात आली असून पुढील एका वर्षात व्यावसायिकांना 850 टॅक्सी सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. 13 हजार टॅक्सी रिप्लेस करण्याची सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
मोबाईल ॲप हे सर्वसमावेशक आहे. घरबसल्या आपण निश्चित प्रवासासाठी मोबाईल ॲपवरून प्रवासाची नोंदणी करू शकतो. आता वेळ बचत होण्याबरोबरच प्रवासही कमी खर्चात होणार असल्याने गोवा माईल्सने राबविलेले अॅप हे निश्चितच दिशादायी ठरणार आहे. गोवा माईल्स ही खेड्यापाड्यातील रस्त्यांची तपासणी व चाचणी करणार असून, राज्यातील प्रत्येक भागात ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोवा माईल्सकडून 100 कोटींची गुंतवणूक
गोवा माईल्स या कंपनीने राज्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी 100 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात ईव्ही व्हेईकल यासाठी सरकार पूर्णपणे प्राधान्य देणार आहे. कुणाचीही फसवणूक होणार नाही आणि कुणाचेही नुकसान होणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आहे.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, गोवा माईल्सने मांडलेल्या विविधांगी कल्पना आज सत्यात उतरत असल्याने वाहतूक खात्याला नवी दिशा प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक खात्यात झालेले हे बदल निश्चितच लाभदायी आहेत. ‘मुख्यमंत्री पात्रांव टॅक्सी योजना’ ही कार्यान्वित केली असून, राज्यातील सर्व व्यावसायिकांना त्याचा लाभ करून देण्यात येत आहे. कदंब महामंडळाला 200 बसेसची गरज असून, मुख्यमंत्र्यांनी त्या पुरवाव्यात, अशी मागणीही वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी केली.
दोन सामंजस्य करारांवर सह्या
सरकारने आज दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. त्यातील पहिला म्हणजे
गोवा माईल्स या खासगी संस्थेशी सरकारने मल्टिमोडल मोबाईल ॲप सामंजस्य करार केला. दुसरा प्लॅनिंग ॲण्ड स्टॅटेस्टिक्स खात्याशी ‘मुख्यमंत्री पात्रांव टॅक्सी योजना’ करार करण्यात आला. दोन्ही करारावर मुख्यमंत्री सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या योजनेतून चार चाकी वाहनासाठी 1 लाख ऊपये, तीन चाकी (रिक्षा) यासाठी 50 हजार तर मोटरसायकल पायलट (दुचाकी) यांना वाहन खरेदीवर 25 हजार ऊपयांची सूट देण्यात येणार आहे.









