खानापुरात संजय राऊत यांचा भव्य रोड शो : समिती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
खानापूर; सीमाभागातील पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी समितीला विजयी करा, मराठी माणसाचा आवाज, मराठी संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान कर्नाटक सरकार सातत्याने करत आहे. यासाठी समितीचा बुलंद आवाज कर्नाटकच्या विधानसभेत पोहोचला पाहिजे. समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांनी समितीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खानापूर येथील समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारसभेत केले. संजय राऊत यांचे खानापुरात भव्य स्वागत करण्यात आले. संजय राऊत, समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील यांनी स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर शहराच्या विविध मार्गांवरून भव्य रोड शो करण्यात आला. यात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. अवघे शहर भगव्या ध्वजांनी आणि टोप्यांनी समितीमय झाले होते. शहरातून रोड शोच्या वेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. स्टेशन रोडवरील हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अर्बन बँक चौकात सभा घेण्यात आली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सीमाभागात मराठी माणसांविरोधात कर्नाटक सरकार कायमच दुजाभावाची वागणूक देत आहे. सीमाभागातील लोकांचा संघर्षाचा इतिहास आहे. शिवसेनेने या संघर्षात कायम त्यागाची भूमिका घेतलेली आहे. 106 हुतात्म्यांचे बलिदान सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने दिले आहे. त्यामुळेच सीमाभागात समिती म्हणजेच शिवसेना आहे. शिवसेना कायम समितीच्या पाठीशी खंबीर आहे. सीमाभागातील सांस्कृतिक सलगता पाहता महाराष्ट्राच्या विठ्ठलाची ही भूमी आहे. मी विठ्ठलाकडे साकडे घालतो सीमाभागातील सर्व समितीचे उमेदवार निवडून यावेत आणि सीमाप्रश्नाची तड लागावी. महाराष्ट्रातील काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाचे नेते सीमाभागात समितीच्या विरोधात प्रचारासाठी येत आहेत. आपल्याच माणसांविरोधात पक्षाचा प्रचार करण्यासाठी सीमाभागात येताना त्यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राची वाट लावलेलीच आहे. सीमाभागातील मराठी माणसांचीही वाट लावण्याचे काम करत आहेत. गेल्या 60 वर्षांपासून महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात पक्षाच्या प्रचारासाठी येऊ नये, असा अलिखीत नियम आहे. मात्र अलीकडच्या भाजप, काँग्रेस आणि शिंदे गटाने नियम तोडून प्रचार यंत्रणा राबविली आहे. देशाचे पंतप्रधान एअरफोर्सच्या विमानाने बेळगावात येऊन प्रचार करत आहेत. श्रीरामाचा नाम जप करणारे आता कर्नाटकात जय बजरंग बलीची घोषणा देऊन प्रचार करत आहेत. ज्या भागात जावे त्या भागातील देवाला तेल वाहावे, अशी पंतप्रधानांची भूमिका आहे. मराठी माणूस गेली 65 वर्षे खितपत पडलेला आहे. याची जाण पंतप्रधानांना नसावी, ही दुर्दैवाची बाब आहे.
के. पी. पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे के. पी. पाटील हे निवडणूक लढवत आहेत. आम्ही त्यांना निवडणूक न लढविण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यांनी आमचा आदेश पाळलेला नाही. यासाठी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारीचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचे उमेदवार म्हणजेच समितीचे उमेदवार, मुरलीधर पाटील यांनाच आमचा जाहीर पाठिंबा आहे. मतदार बंधू-भगिनींनो समितीलाच मतदान करून विजयी करावे, असे आवाहन राऊत यांनी केले.









