बासमती- इंद्रायणी बियाणांची मागणी : खासगी केंद्रांवर वाढीव दराने विक्री
बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यात पेरणीसाठी तयारी सुरू आहे. विशेषत: भात पिकांसाठी बियाणांची जमवाजमव केली जात आहे. परंतु सरकारकडून शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 80 रुपये किलो बासमती तर 90 रुपये किलो दराने इंद्रायणी भाताची खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून सरकारने कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
अनगोळ, शहापूर, वडगाव, येळ्ळूर, जुनेबेळगाव, धामणे, मजगाव, मच्छे, झाडशहापूर, देसूर, खादरवाडी, हुंचेनट्टी, नावगे, कर्ले, किणये, बहाद्दरवाडी, जानेवाडी, बिजगर्णी, बाची, बेळगुंदी, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, हिंडलगा, कडोली, जाफरवाडी, कंग्राळी, सांबरा, मुतगा, कुडची यासह परिसरात बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी, अमन, इंटान, दोडगा यासह इतर जातींचे भातपिके घेतली जातात. सर्वाधिक मागणी ही बासमती, इंद्रायणी, सोनम या भात पिकांना आहे.
यावर्षी बासमती भाताचा दर प्रती क्विंटल 3500 तर इंद्रायणी भाताचा दर प्रति क्विंटल 2500 रुपये होता. परंतु सध्या बियाणांचे दर मात्र 2 ते 3 पटीने वाढविण्यात आले आहे. भातविक्री करताना कवडीमोल दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. परंतु बियाणे घेताना मात्र प्रती किलो 80 ते 90 रुपये दर आकारण्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कृषी केंद्रांवर अभिलाषा व बीपीटी ही बियाणे उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांकडून बासमती व इंद्रायणी बियाणांची मागणी होत आहेत. त्यामुळे खासगी कृषी केंद्रांवरून अवाच्या सव्वा दराने बियाणांची खरेदी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.









