भारताची हानी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला बांगड्या भरावयास लावू, असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर या मतदारसंघातील प्रचार सभेत त्या देशावर हल्लाबोल केला आहे. भारताने पाकिस्तानच्या नादाला लागू नये. त्या देशाने काही बांगड्या भरलेल्या नाहीत, अशी टिप्पणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये केली होती. त्या संदर्भात त्यांनी हे विधान केले
पाकिस्तानची स्थिती सध्या दयनीय झाली आहे. पण आपल्याकडील विरोधकांचे पाकिस्तानप्रेम उफाळून आले आहे. पाकिस्तानच्या अणुबाँबची भीती ते आम्हाला दाखवू पहात आहेत. तसेच पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत, अशी त्या देशाची वकीली ते भारतात राहून करीत आहेत. पाकिस्तान सध्या बांगड्या भरत नसेल तर आम्ही त्याला तेही करावयास लावू, अशी टिप्पणी त्यांनी केली.
विरोधक पाकिस्तानला घाबरतात
विरोधी पक्षांच्या आघाडीत अनेक नेते असे आहेत, की जे पाकिस्तानला घाबरतात. त्या देशाला घाबरण्याचे हे आतबट्ट्याचे धोरण या पक्षांनी आजवर चालविले होते. त्यामुळे पाकिस्तानची मुजोरी वाढली. आता हे विरोधी नेते विद्यमान भारत सरकारलाही घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांचा प्रयत्न निश्चितपणे वाया जाणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता त्यांना असा धडा शिकविणार आहे, की त्यांना आत्मपरीक्षण करावे लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘तो पैसा गरीबांच्या मालकीचा’
गेल्या दहा वर्षांमध्ये ईडीने विरोधी पक्षनेत्यांवर टाकलेल्या धाडींमधून सरकारने 2,200 कोटी रुपयांचे बेहिशेबी धन हस्तगत केले आहे. काँग्रेसप्रणित सरकारच्या 10 वर्षांच्या काळात केवळ 35 लाख रुपये मिळविण्यात आले होते. गेल्या 10 वर्षांमध्ये भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आम्ही चालविलेल्या अभियानाला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे विरोधक भांबावले असून त्यांनी ईडीच्या दुरुपयोगाचा आरोप करण्यास प्रारंभ केला. पण बेहिशेबी पैसा जप्त करणे हे ईडीचे कामच आहे. आमच्या सरकारने ईडीच्या कामात हस्तक्षेप न करता या संस्थेला मुक्तपणे काम करु दिले. त्यामुळे आर्थिक गैरप्रकारांवर आळा बसला. परिणामी, विरोधी पक्षांची तारांबळ उडाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुझफ्फरपूर येथील सभेच्या आधी बिहारमध्येच हाजीपूर येथील सभेतही त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करुन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.









