युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाची मागणी : मोर्चाने निवेदन
बेळगाव : प्रभूनगर (ता. खानापूर) येथील मालमत्ता क्र. 510 येथील खुली जागा डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवनासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाने केली आहे. संघाच्या सदस्यांनी बुधवारी मोर्चाने जिल्हा पंचायत कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. निट्टूर ग्राम पंचायतीच्या हद्दीतील प्रभूनगरात डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवन निर्माण करण्यासाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीसाठी 2007-2008 मध्ये ठराव मंजूर करण्यात आला. मालमत्ता क्र. 510 मधील 60×40 ही खुली जागा देऊन त्यासंबंधीचा उताराही देण्यात आला आहे. ही खुली जागा दाखविण्यासाठी दलित बांधवांनी अनेकवेळा मागणी केली तरी ती जागा दाखविण्यात येत नाही. ही जागा समुदाय भवनासाठी खुली करून द्यावी, तसेच अनुसूचित जातीच्या स्मशानभूमीसाठी जाण्याच्या मार्गावर अतिक्रमण झाले असून, याची चौकशी व्हावी. मादर गल्लीमध्ये जुन्या विहिरीवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, बांधकाम हटविण्यात यावे, अशा मागण्या युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाने निवेदनातून केल्या आहेत. मोर्चामध्ये संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









