जिल्हाधिकारी : बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण
बेळगाव : सालाबादप्रमाणे येथील जिल्हा क्रीडांगणावर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. दि. 26 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक आहे. पोलीस खाते, अग्निशमन, केएसआरपी, एनसीसी, स्काऊट अँड गाईड यांनी परेडमध्ये सहभाग घ्यावा. यासाठी पूर्वतयारी करावी. केएमएफ आणि मिठाई असोसिएशनकडून परेडमध्ये सहभाग घेऊन सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठ, आसन व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेऊन वेळेत काम पूर्ण करावे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये विद्युत रोषणाई, सजावट करण्यात यावी. सरकारी कार्यालयांसह नागरिकांनीही आपल्या घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करावा. देवालय व मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेसाठी धर्मादाय खात्याने व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सूचना करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, अतिरिक्त पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी आदी उपस्थित होते.
प्लास्टिक ध्वज विक्रीवर निर्बंध
प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजविक्रीला निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्लास्टिक ध्वजांची विक्री करण्यात आल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
10 कोटीचा प्रस्ताव…
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात काँग्रेस अधिवेशन भरवून शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असा प्रस्ताव स्वातंत्र्ययोद्धे राजेंद्र कलघटगी यांनी मांडला. यावेळी या कार्यक्रमासाठी सरकारकडे 10 कोटी निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शतमानोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









