गर्लगुंजी येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे आवाहन
खानापूर : सीमाप्रश्नासाठीची मराठी अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्यक्षात कृतीची वेळ आली आहे. आता नाही तर कधीच नाही. यासाठी समस्त मराठी भाषिकांनी म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन गर्लगुंजी येथे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले. अध्यक्षस्थानी गोपाळ पाटील होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, उमेदवार मुरलीधर पाटील, शुभम शेळके, गोपाळ देसाई आदी उपस्थित होते. आमदार निलेश लंके यांचे सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत केले. लंके यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभागात सत्कार स्वीकारणार नाही, असे सांगत सत्कार नाकारला. यावेळी अपंग कलाकार पुंडलिक कुंभार यांनी बुद्ध मूर्ती भेट दिली. लंके पुढे म्हणाले, कर्नाटकचा उद्धटपणा थोपवण्यासाठी समितीचा आमदार असणे काळाची गरज आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी समितीचे आमदार निश्चितच प्रयत्नशील राहतील. सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सीमाप्रश्न सोडून घेऊया. ज्या गावात 66 वर्षे दिवाळीची आरती केली जात नाही अशा जळगे गावातून मुरलीधर पाटील उमेदवार म्हणून उभे आहेत. संपूर्ण तालुका क्रांतिकारी आहे. गर्लगुंजी गाव क्रांतिकारकांचे गाव असल्याने गर्लगुंजीतून शंभर टक्के मतदान समितीला व्हावे, तसेच विजयाचा गुलाल समितीवर उधळावा, हीच तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करतो, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी शुभम शेळके म्हणाले, समितातून आमदारकी मिळवलेल्यांनी कमळ हातात धरून चिखल करून घेतला आहे. चंद्र, सूर्य असेपर्यंत समिती यशस्वी होणार नाही, असे म्हटलेल्यांचा चंद्र आणि सूर्यही गेला आहे. समितीच्या त्यागाचा ज्यांनी अपमान केला, ते कधीच यशस्वी होणार नाहीत. समिती चळवळ असल्याने तिच्या त्यागाचा इतिहास वेगळा आहे. यासाठी समिती उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले. यावेळी सीमासत्याग्रही शंकर पाटील, प्रकाश चव्हाण, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी, यशवंत बिरजे, शंकर गावडा, महादेव घाडी, जगन्नाथ बिर्जे, रणजीत पाटील, शामराव पाटील, विनोद पाटील, नारायण कापोलकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला वर्गांचाही सहभाग मोठा होता.









