पुणे / प्रतिनिधी :
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी तसेच ती उद्योगाची आणि रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी विद्यापीठीय स्तरावर शिकविल्या जाणार्या सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य करावा, असा ठराव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. विद्यापीठ स्तरावर असा ठराव करणारे पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाची बैठक विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत पार पडली. मागील काही वर्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात मातृभाषेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी तसेच मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रत्येक विद्याशाखेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविली जावी. विद्यापीठीय स्तरावर मातृभाषा शिकविल्यास ती व्यवसायाची, उद्योगाची आणि ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर मराठी भाषा अनिवार्य करण्याचा ठराव बैठकीत एक मताने मांडण्यात आले
या बैठकीला अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, सदस्य डॉ. सुधाकर शेलार, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. पोर्णिमा घोडके, डॉ. सुरेश जाधव, राजीव बर्वे, डॉ. शीतल गोर्डे पाटील, डॉ. शोभा तितर, संजय ऐलवाड आदी उपस्थित होते.








