‘केएमए’ची मागणी, मंत्री आबिटकर व मुश्रीफ यांचा केएमएतर्फे सत्कार
आरोग्य संपन्न जिल्हा बनविण्याची दोन्ही मंत्र्यांकडून ग्वाही
गर्भाशय कर्करोग प्रतिबंध लसीकरण 500 मुलींनी घेतला लाभ
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने पूर्णत: आदर्शवत करण्यासाठी व याचा आदर्श आदर्श राज्यात रुजू व्हावा, यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन प्रयत्न करणार आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा ‘मेडिकल हब’ होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी केएमएचे अध्यक्ष अमोल कोडोलीकर यांनी केली.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवारी पालकमंत्री आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मेडीकल टुरिझममुळे कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला पुणे, मुंबई किंवा बेंगलोरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. बाहेर गावचे आणि परदेशातील रुग्णसुद्धा कोल्हापूरमध्ये उपचारासाठी कसे येतील. याकरिता दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे डॉ. कोडोलीकर यांनी सांगितले. याला राज्य व केंद्र पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करून सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री आबिटकर व मुश्रीफ यांनी दिले.
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तब्बल 500 मुलींनी या मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. केएमए व यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. राधिका जोशी व मुंबई येथील कॅन्सर पेशंट एडच्या कार्यकारी संचालिका डॉ. नुपूर खरे यांच्या पुढाकारातून मोहीम पार पडली. इनरव्हीलच्या स्मिता सावंत, रोटरीच्या योगिनी कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. केएमएचे सचिव डॉ. शितल देसाई यांनी आढावा घेतला. डॉ. उन्नती सबनीस यांनी सूत्रसंचालन केले. खजानिस डॉ. अरुण धुमाळे यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अजय केणी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ.शितल पाटील, डॉ. आशा जाधव, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. संतोष प्रभू, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. गीता पिल्लाई, डॉ.राजेंद्र वायचळ, केएमएचे माजी अध्यक्ष डॉ. हणमंत पाटील, डॉ. विद्युत शहा डॉ. उल्हास दामले, डॉ. महावीर मिठारी, डॉ. अर्चना पवार, डॉ. आश्विनी पाटील उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्र दर्जेदार व सक्षमीकरणसाठी प्रयत्न : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
जिह्याचेच नव्हे तर राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवनवीन योजना आणून दर्जेदार व सक्षम आरोग्य सेवासुविधांचा लाभ रुग्णांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून अद्ययावत तंत्रज्ञाान विकसित करण्यास चालना देणार आहे. मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध लसीकरण मोहीम राज्य पातळीवर राबवणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या आरोग्यासाठी निधी उपलब्ध करू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिह्याला मेडिकल हब बनवणे आणि मेडिकल टुरिझमद्वारे परदेशातील तसेच देशातील विविध भागातील रुग्ण उच्च दर्जाचे उपचार घेण्यासाठी कसे येतील, याकरिता जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येईल. दिवाळीपर्यंत सीपीआर सुसज्ज व अद्ययावत करणार आहे. तसेच शेंडा पार्कमध्ये सुसज्ज हॉस्टेल, लायब्ररी, व लवकरच 1100 बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
Previous Articleराष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित
Next Article एसटी भाडेवाढीतून अन्य योजनांच्या पैशांची वसुली








