रशियाने भारताचे अनुकरण करण्याची गरज
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. भारत स्वत:च्या देशात विदेशी कंपन्यांना उत्पादनासाठी आमंत्रित करत आहे. आमचे विशेष मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया पुढाकार सुरू केला होता. भारताच्या अर्थव्यवस्थेवर आता याचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
पुतीन यानी मॉस्को येथे रशिया एजेन्सी फॉर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजकडून आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले आहे. रशियात देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँड्सना चालना देण्यासाठी भारत उत्तम उदाहरण आहे. पाश्चिमात्य देश रशियासोबतच्या व्यापारावर निर्बंध लादत असताना आम्हाला भारताप्रमाणे स्वदेशी कंपन्यांना बळ देत त्यांना एक उत्तम बाजारपेठ उपलब्ध करण्याची गरज असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
रशिया आणि भारतादरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारी आहे. ही भागीदारी काळासोबत मजबूत होत आहे. काही काळापासून रशियासंबंधी जगभरात दुष्प्रचार केला जात आहे. भारत-रशिया संबंधांत दुरावा आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, परंतु आम्ही पूर्वीपेक्षा अधिक घनिष्ठ झालो आहोत असे उद्गार रशियाचे राजदूत डेनिस एलिपोव्ह यांनी अलिकडेच काढले आहेत.
मोदी खरे देशभक्त
रशियाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये पुतीन यांनी मोदींना खरा देशभक्त संबोधिले होते. मोदींच्या नेतृत्वात भारताने विकासयात्रेत मोठे यश मिळविले आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. मेक इन इंडियाचा मोदींचा विचार अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अत्यंत योग्य असल्याचे पुतीन यांनी म्हटले हेते.









