रवी बंगारेप्पन्नावर यांचे आवाहन : मजुरांना प्रथमोपचार पेटीचे वितरण
बेळगाव : 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून मजुरी करणाऱ्या कामगारांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळवून योजनेचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नावर यांनी केले. बस्तवाड, ता. बेळगाव ग्राम पंचायत हद्दीतील नाल्याच्या स्वच्छतेचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असून कामगारांना गुरुवारी प्रथमोपचार पेटीचे वितरण करून बंगारेप्पन्नावर बोलत होते. याच महिन्यापासून दिव्यांगांची नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. ग्राम पंचायतींनी दिव्यांगांना रोजगार हमी योजनेंत सामवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही बंगारेप्पन्नावर म्हणाले. त्यानंतर धामणे एस. व येळ्ळूर ग्राम पंचायत हद्दीमध्ये रोहयोंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या स्थळांना भेट देऊन मजुरांना प्रथमोपचार पेटीचे वितरण केले. यावेळी बेळगाव तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी बी. एम. बन्नूर, डीआयईसीचे संयोजक प्रमोद घोडेकर, तांत्रिक संयोजक मुरुगेश यकंची, संयोजक रमेश मादर, ग्राम पंचायत विकास अधिकारी, तांत्रिक साहाय्यक तसेच ग्रा. पं. चे कर्मचारी उपस्थित होते.









