संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन ः राजदूतांची गोलमेज परिषद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअरो इंडिया 2023 साठी नवी दिल्लीमध्ये राजदूतांची गोलमेज परिषद सोमवारी पार पडली असून यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाग घेतला आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये ‘मेक फॉर द वर्ल्ड’ देखील सामील आहे. काही देशांना अन्य देशांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जाणाऱया जागतिक व्यवस्थेवर भारताचा विश्वास नाही. एखाद्या देशासोबत आम्ही जेव्हा भागीदारी करतो, तेव्हा ती समानता आणि परस्पर सन्मानाच्या आधारावर असते असे उद्गार राजनाथ यांनी काढले आहेत.
भारत सध्या जी20 चे अध्यक्षत्व करत आहे. जी20 सदस्य जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के तर जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्याहून अधिक हिस्स्याचे प्रतिनिधित्व करतात. जी20 मध्ये सर्वसहमती तयार करणे आणि अधिक सुरक्षित, समृद्ध, टिकाऊ आणि न्यायपूर्ण जगाच्या अजेंडय़ाला आकार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जी-20 च्या अध्यक्षत्वाकडे भारताला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी म्हणून पाहत आहोत. यात भारताचे 3डी म्हणजेच डेव्हलपमेंट, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटी सामील असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.
केवळ भारतासाठी प्रयत्न नव्हेत
भारताचा आत्मनिर्भरतेचा पुढाकार स्वतःच्या सहकारी देशांसोबत भागीदारीचा नवा अध्याय सुरू करत आहे. मेक इन इंडियामध्ये मेक फॉर द वर्ल्ड सामील असल्याचे मी अधोरेखित करू इच्छितो. मेक इन इंडियाच्या दिशेने आमचे प्रयत्न हे केवळ भारतासाठी नाहीत असे राजनाथ सिंह म्हणाले.
बेंगळूरमध्ये होणार आयोजन
13-17 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूर शहरात एअरो इंडिया 2023 चे आयोजन करणार आहोत. एअरो इंडिया 2021 मध्ये 600 हून अधिक कंपन्यांनी भाग घेतला होता. 63 देशांशी संबंधित सुमारे 3 हजार बिझनेस-टू-बिझनेस बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यंदाचा एअरो इंडिया कार्यक्रम नवे विक्रम नोंदविणार अशी अपेक्षा असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.









