हुगळीतील प्रभावित क्षेत्राचा दौरा
वृत्तसंस्था/ हुगळी
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी हुगळी येथील हिंसाग्रस्त भागांचा दौरा केला आहे. या दौऱयादरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱयांकडून हिंसेच्या घटनेसंबंधी माहिती जाणून घेतली आहे. हुगळीच्या रेल्वेस्थानकाबाहेर मंगळवारीही दगडफेक झाली आहे.
राज्यपालांनी रेल्वेस्थानकावर पोहोचून तेथे पोलीस अधिकाऱयांशी संवाद साधला आहे. वाईट शक्तींना सामाजिक सौहार्द बिघडवून देणार आही, समाजकंटकांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. लोकांना शांततेत जगण्याचा अधिकार असून या अधिकाराचे कुठल्याही स्थिती रक्षण केले जाणार असल्याचे राज्यपाल बोस यांनी म्हटले आहे.
कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडून याप्रकरणी कठोर कारवाई केली जाणार आहे. समाजकंटकांना कायदा स्वतःच्या हातात घेण्याची अनुमती आम्ही देणार नाही. पोलीस अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घकाळापासून हिंसेने पीडित असून आम्ही ही पीडा लवकरच संपविणार आहोत असे उद्गार राज्यपालांनी काढले आहेत.
बिहारमधून एकाला अटक
पश्चिम बंगाल पोलिसांनी बिहारमधून एका युवकाला अटक केली आहे. आरोपीचे नाव सुमित साव असून तो हावडा येथील शोभायात्रेत शस्त्रासह सामील झाला होता. एका व्हिडिओ फुटेजलमध्ये सुमित रिव्हॉल्व्हरसह दिसून आला होता. तर बिहारमधून युवकाला अटक करण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भाजपने नियोजनपूर्वक हिंसा घडवून आणल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. तर भाजपने तृणमूल काँग्रेसनेच ही हिंसा घडवून आणल्याचा दावा केला आहे.









