केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला : बाराशे कोटींच्या मोपा ‘लिंक रोड’चे उद्घाटन, गोव्याचे प्राकृतिक सौंदर्य जपण्याचेही आवाहन
पेडणे : मोपा लिंक रस्त्यामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळणारच त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गोव्यात येणारे पर्यटक आणि वाढती लोकसंख्या यामुळे गोव्यात प्रदूषण होऊ नये, यासाठी गोवा सरकारने आत्ताच ‘मास्टर प्लॅन’ आखण्याची गरज आहे तरच गोवा हे सुंदर आणि प्रदूषणमुक्त राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दृष्टिकोनातून काम करावे, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोपा लिंक रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना दिला.
गोव्यात उत्तराखंड किंवा केदारनाथ येथे ज्या घटना होतात, तशा गोव्यात होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हा एक्सेस हायवे बनवण्याचे कामही हाती घेण्यात आलेले आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादभाऊ नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री आलेक्स सिक्वेरा, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रधान अभियंते पार्सेकर उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा वापर व्हावा
गडकरी पुढे म्हणाले की प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक गाड्या घेण्याच्या दृष्टिकोनातून गोव्यात विचार व्हायला हवा. केंद्र सरकारचा त्यादृष्टीने प्रयत्न आहे. गोव्यात सध्या जे प्रदूषण आहे ते कमी व्हायला पाहिजे. पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी रस्ते चांगले केले आहेत. जुवारी पुलावर रेस्टॉरंट बांधायचं होतं. त्या दृष्टीने कामही सुरू झालं होतं. मात्र त्या कंपनीने ते केले नाही. आता मुख्यमंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. केंद्राकडून सर्व ती मदत दिली जाईल.
श्रीपादभाऊंच्या तिनही मागण्या मान्य
नईबाग, धारगळ आणि पेडे येथे अपघात होतात. यासाठी श्रीपादभाऊंनी केलेल्या तीनही मागण्या आपण मान्य करत आहे. तेथे अपघात होऊ नये ही श्रीपादभाऊंची मागणी लवकरात लवकर पूर्ण करतो. जगातल्या पाच शहरामध्ये गोव्याचं नाव यावं अशी आपली इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून गोवा सरकारने काम करावे. गोव्याच्या विकासामध्ये मोठी भर केंद्र सरकारने घातलेली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मागणी केल्यानुसार मडगाव बायपास नावेली पाळोली या 45 किलोमीटरसाठी साडेतीन हजार कोटी ऊपये आपण मंजुरी देत असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.
पंतप्रधान, गडकरीमुळे गोव्यात विकास शक्य
आज लिंक रस्त्याचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. गडकरी यांचे गोव्यावर असलेले प्रेम त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी गोव्यासाठी भरघोस निधी दिलेला आहे. ज्यांनी या लिंक रस्त्यासाठी जमीन दिली त्यांचे आपण आभार मानतो. हा प्रोजेक्ट दोन वर्षाच्या आत पूर्ण केल्याबद्दल अशोक बिल्डकॉन कंपनी आणि त्याचे कन्सल्टन्ट आणि बिल्डराचे अभिनंदन आणि कौतुक करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. गतिशक्ती असलेले गोवा हे देशातील पहिले राज्य होणार आहे. रस्ता, एअरपोर्ट आणि बंदर या तीनही गोष्टी या ठिकाणी असून त्यातून देशाच्या विकासाला आणि राज्याच्या विकासाला चालना मिळत आहे. राज्याचा विकास गतीने सुरू असून विकसित भारत 47 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
टोलमध्ये मिळणार सवलत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले पेडण्यातील टॅक्सीवाल्यांचा विषय आहे की टोल माफ करावा. आपण गडकरी साहेबांकडे बोललो, मात्र टोल माफ होऊ शकत नाही. त्यासाठी ते आम्हाला सवलत देतील अशी आशा आहे.
गडकरींनी विविध राज्यांना जोडले
यावेळी बोलताना केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादभाऊ म्हणाले देशातील विविध राज्यांना चांगल्या रस्त्यांनी जोडण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. गोव्यासाठीही त्यांचं भरीव योगदान आहे. सुऊवातीला गडकरी यांच्या हस्ते फीत कापून तसेच समई प्रज्वलित करून रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, आमदार डॉ. दिव्या राणे, डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार दिलायला लोबो, आमदार दाजी साळकर, आमदार केदार नाईक, आमदार उल्हास तुयेकर, पेडण्याचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, उत्तर गोवा भाजपचे अध्यक्ष महानंद अस्नोडकर तसेच विविध खात्यांचे अधिकारी, अभियंते, विविध पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.