केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे तरुणांना आवाहन
पणजी : जी 20 पर्यटन कृतीगटाच्या बैठकीनिमित्त गोव्यात आलेले केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंगळवारी डेम्पो एक्सप्लोरर्स युवा टुरिझम क्लबच्या सदस्यांशी संवाद साधला. या सत्रात युवा टुरिझम क्लबच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला आणि भारतात पर्यटनाला चालना देण्यासंबंधी त्यांच्या समर्पणाबद्दल मंत्र्यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि केंद्रीय पर्यटन महासंचालक मनिषा सक्सेना आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना रेड्डी यांनी पर्यटन क्लबच्या नियमित कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देताना भविष्यात पर्यटन क्षेत्राला आकार देण्यासाठी तऊणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘देखो अपना देश’ संकल्पनेचाही त्यांनी उल्लेख केला. आज लोकांचा कल आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे वाढत आहे हे खरे असले तरी स्वत:च्या मातृभूमीचे सौंदर्य आणि वारसा जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. सध्या जम्मू-काश्मीर, हरिद्वार, काशी, केदारनाथ या प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे मंत्री रेड्डी यांनी नमूद केले. भारताचा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यटनाचे राजदूत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. खंवटे यांनी बोलताना डेम्पो एक्सप्लोरर्सच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. तऊणांना पर्यटनदूत बनण्यासाठी सरकारसोबत भागिदार बनवण्याची भूमिका त्यांनी विशद केली. विद्यार्थी आणि क्लबच्या सदस्यांनी पर्यटन उद्योगाच्या समस्या सोडविण्यातही योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले व रेड्डी यांचे आभार मानले. डेम्पो एक्सप्लोरर्स युवा टुरिझम क्लबच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची देवाणघेवाणही या सत्रात झाली, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना ही चित्रे सादर करण्यात आली.









