सकाळपासूनच अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : नदीकाठावर जत्रेचे स्वरूप : भाविकांनी नदीत पवित्र स्नानाचा घेतला आनंद
खानापूर : खानापूर शहर आणि तालुक्यात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संक्रांत पर्वाच्या निमित्ताने तालुक्यातील मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मलप्रभा नदी स्नानाचा पूण्यपर्वकाळ साधण्यासाठी बेळगाव, धारवाड परिसरातील भाविकांनी खानापूर, असोगा, हब्बनहट्टी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. संक्रांतनिमित्त एकमेकाला तिळगूळ वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. यानिमित्त खानापूर तसेच असोगा, हब्बनहट्टी, पारिश्वाड, कणकुंबी, यडोगा, चापगाव, हिरेहट्टीहोळी आदी ठिकाणी मलप्रभा नदीत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक मकर संक्रांतीदिनी नदीमध्ये स्नान करून नदीकाठावर महाप्रसाद करतात व नदीची ओटी भरतात. यामुळे नदीतिरावर जत्रेचे स्वऊप प्राप्त आले होते.
असोगा येथे मलप्रभा स्नानासाठी भाविकांची गर्दी
खानापूर, असोगा येथे मलप्रभा स्नानासाठी बेळगाव, चंदगड, जोयडा तालुक्यातूनही भाविक वर्ग मोठ्या संख्येने हजर झाले होते. यामुळे खानापूरकडे येणाऱ्या सर्व बस व खासगी वाहने भाविकांनी भऊन येत होती. असोग्याला जाण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. असोगा येथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खानापूर-असोगा रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे रेल्वेस्टेशन परिसरात दिवसभरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. रामलिंग देवस्थानात पहाटेच पूजा-अभिषेक करण्यात आला होता. नदीपात्रातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. त्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडण्यात येत होते. मंदिर परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
हंडीभडंगनाथ मठावर भाविकांची मोठी गर्दी
हंडीभडंगनाथ मठावर संक्रांतनिमित्त मठाचे मठाधीश पीर मोहननाथ यांनी विशेष पूजा केली होती. या ठिकाणीही खानापूर, धारवाड, हल्याळ, बैलहोंगल, जोयडा परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मठावर भाविकांना प्रसादाचेही आयोजन केले होते. तसेच मलप्रभा नदीपात्रालगत असलेल्या हब्बनहट्टी येथील स्वयंभू श्री हनुमान मंदिराच्या व्यवस्थापन कमिटीने भाविकांसाठी पूजेचे आयोजन केले होते. तसेच भक्तांसाठी प्रसादाची सोय केली होती. मकर संक्रांतनिमित्त खानापूरसह जांबोटी व बेळगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
आजही स्नान-पूजेसाठी होणार गर्दी
मंगळवारी कंक्रांत असल्याने मंगळवारीही स्नानासाठी आणि पूजेसाठी भाविकांची गर्दी होणार आहे. तसेच खानापूर शहरात सायंकाळी ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, चौराशी मंदिर, गणेश मंदिर, लक्ष्मी मंदिर, सातेरी माउली मंदिर तसेच इतर मंदिरात देवाला तिळगूळ वाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. देवाला तिळगूळ अर्पण केल्यावर मंदिराबाहेर एकमेकाला तिळगूळ देऊन सर्वांनी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.









