रंगीबेरंगी तिळगूळ, रेडिमेड लाडू, चिक्कीसह तिळगूळचे दागिने आदी पदार्थांच्या मागणीत वाढ : महिलांची रेलचेल
बेळगाव : मकरसंक्रांतीसाठी विविध साहित्यांनी बाजारपेठ रविवारी सजली होती. विशेषत: रंगीबेरंगी तिळगूळ आणि इतर साहित्याची विक्री झाली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने महिलावर्गासह बालचमूंची लगबग पहावयास मिळाली. शनिवारी भोगीनिमित्त भाज्यांची खरेदी-विक्री वाढली होती. तर सोमवारी मकरसंक्रांत असल्याने रविवारी बाजारात रेलचेल पहावयास मिळाली. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारात तिळगूळ, गुळाचे लाडू, चटणी आणि इतर साहित्याची लगबग पहावयास मिळाली. यंदा तिळगुळांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 30 ते 40 रुपये किलो मिळणारे तिळगूळ यंदा 50 रुपये झाले आहेत. त्यामुळे तिळगुळांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याबरोबर रेडिमेड लाडू, चिक्की यासह तिळगूळचे दागिने आदी पदार्थांची मागणी वाढली होती. शहरासह ग्रामीण भागातीलही महिला खरेदीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, समादेवी गल्ली आदी ठिकाणी वर्दळ पहावयास मिळाली.
सोशल मीडियावर संक्रांतीच्या शुभेच्छा
रविवारी भोगीपासूनच सोशल मीडियावर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होती. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’, असे संदेश पहावयास मिळाले.
तयार भाकरी, चटण्यांच्या मागणीत वाढ
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकात किरकोळ विक्रेत्यांकडून तिळगूळ विक्री होत होती. काकतीवेस, शनिवार खुट, समादेवी गल्ली यासह इतर भागातही तिळगुळांची विक्री झाली. त्याचबरोबर लहान मुलांसाठी तिळगुळांचे डबे आकर्षण ठरत होते. संक्रांतीला विविध चटण्या आणि भाकरीवर देखील भर दिला जातो. त्यामुळे बाजारात तयार भाकरी आणि चटण्यांची मागणीही वाढली होती.









