ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर यांनी काल राज्यपाल यांची भेट घेत त्यांनी बहूमत चाचणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी अधिवेशन बोलावून शुक्रवारी ५ पर्यंत बुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर शिवसेनेनं याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज ५ वाजता यावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ठाकरे सरकारला पत्र लिहलं आहे. या पत्रात राज्यपालांनी अशा पद्धतीने अटी घातल्या आहेत की ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारला यातून पळवाट शोधणं अवघड होणार. विधानसभेचं कामकाज जास्त वेळ चालवून बहुमत चाचणीचा वेळ वाढवण्याची खेळीही महाविकास आघाडीला करता येणार नाही. नेत्यांची भाषणं घेऊन बहुमत चाचणी लांबविता येणार नाही. राज्यपालांनी उद्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांनी घातलेल्या ‘या’ अटी
१. राज्याच्या विधान भवनाचं विशेष अधिवेशन गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात यावं. तसंच यामध्ये फक्त सरकारच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया घ्यावी. यावेळी सरकारचा इतर कोणताही अजेंडा असू नये. बहुमत चाचणीची ही प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करावी.
२. राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरात आणि आतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची संपूर्ण काळजी सरकारने घ्यावी.
३. बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं सभागृहातील कामकाजाचं लाइव्ह टेलिकास्ट केलं जावं आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध करावी.
४. बहुमत आवाजी पद्धतीने होणार नाही. मतदानाची प्रक्रिया शिरगणती पद्धतीनं घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभं राहून आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.
५. विशेष अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया आणि बहुमत चाचणी उद्याच पूर्ण करण्यात यावी. हे अधिवेशन कोणत्याही पद्धतीनं स्थगित करता येणार नाही.
६. संपूर्ण अधिवेशनाचं स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जावं. या रेकॉर्डिंगची जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची राहील. तसंच याचं संपूर्ण फुटेज माझ्याकडे सुपूर्द करावं.
दरम्यान, राज्यपालनी घातलेल्या या अटींमुळे महाविकास आघाडी सरकारला पळवाट शोधणे अवघड झालं आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. पण सेनेनं या विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर आज ५ वा. सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर उद्या बहुमत चाचणी होणार की नाही हे समजणार आहे.