इंजिन गेले पुढे, डबे राहिले मागे
वृत्तसंस्था/ समस्तीपूर
बिहारच्या समस्तीपूरमध्ये मोठी रेल्वेदुर्घटना टळली आहे. दरभंगा येथून दिल्लीच्या दिशेने जाणारी बिहार संपर्क क्रांति एक्स्प्रेस पूसा आणि कर्पूरीग्राम स्थानकादरम्यान दोन हिस्स्यांमध्ये विभागली गेली. ट्रेनचे इंजिन दोन डब्यांसह निघून गेले, तर उर्वरित डबे मागेच राहिले. कपलिंग खुलल्याने आणि दोन डब्यांसह इंजिन वेगळे झाल्याने प्रवाशांना मोठा झटका बसला. या घटनेमुळे लोक घाबरले, परंतु सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. काही अंतर गेल्यावर चालकाने इंजिन रोखले, त्यानंतर कशाप्रकारे तरी इंजिन मागे नेत पुन्हा उर्वरित डबे जोडण्यात आले आणि कमी वेगासह रेल्वेगाडी पूसा स्थानकात आणली गेली.
दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि रेल्वेच्या कपलिंगची पडताळणी करण्यात आली. रेल्वेच्या अनेक तंत्रज्ञांनी रेल्वेगाडीची तपासणी केली आहे. या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यावरच काही सांगता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.









