बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे शहर परिसरात विविध साहित्याच्या खरेदीला उधाण आले आहे. यामुळे बाजारासह शहरात नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावे लागत आहे. रविवारी सायंकाळी पाटील गल्ली ते फोर्टरोडपर्यंत मोठा ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना अडचणीला सामोरे जावे लागले. गणेशोत्सव हा आनंदाचा व उत्साहाचा सण आहे. यामुळे गणेशाच्या स्वागतासाठी तयारी करण्याची लगबग नागरिकांकडून केली जाते. लवकरात लवकर विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेसह गल्लोगल्ली फिरताना दिसत आहे .
मोटारसायकल, कारसह इतर वाहनांच्या मदतीने नागरिक खरेदीसाठी शहरात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिक सकाळपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत होते. शहर परिसर पिंजून काढत नागरिकांनी खरेदी केली. मात्र हे करत असताना अनेकवेळा वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. पाटील गल्लीतून फोर्ट रोडकडे जाण्यासाठी मार्ग आहे. येथे विविध प्रकारची ईलेक्ट्रॉनिक्सची दुकाने असल्याने या परिसरात सततची गर्दी असते. रविवारी सायंकाळी पाटील गल्ली ते फोर्ट रोडपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला.









